कऱ्हाड : प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यामुळेच स्वबळाची भाषा करीत आहेत. कार्यकर्त्यांत ऊर्जा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच काँग्रेसने आजपर्यंत बहुदा स्वतंत्र लढल्या आहेत; पण पटोले यांच्या स्वबळाच्या विधानाने राज्यातील आघाडी सरकारला कसलाही धोका नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले आहे. नवा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल; पण कोणाला अध्यक्ष करायचे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील.’’ राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कमलनाथ यांना नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत, याकडे लक्ष वेधले असता आमदार चव्हाण म्हणाले की, याबाबत नेमकी माहिती नाही; पण लवकरच काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल.
जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत छेडले असता, ईडीच्या कारवाईत फक्त चौकशा होतात. तपास शेवटपर्यंत काही जात नाही, असे चव्हाण म्हणाले. बंद पडलेल्या उंडाळे जीवन प्राधिकरण पाणी योजनेच्या पुनर्वसनासाठी ६ कोटी २५ लाख निधी मंजूर झाला आहे. त्याची निविदाही निघाली असून, परिसरातील अनेक गावांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्राने केलेल्या करवाढीमुळेच पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. ४ मे पासून आतापर्यंत ४० वेळा पेट्रोल तर ३७ वेळा डिझेलचे दर वाढले आहेत. परिणामी, महागाईचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे. त्यामुळे केंद्रातील फक्त मंत्री बदलून उपयोग होणार नाही तर आता मोदींनाच बदलावे लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
चौकट
कराडला १०० बेडचे महाजम्बो कोविड सेंटर
कोरोना महामारीचे संकट मोठे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड येथे यशवंतराव चव्हाण बहूद्देशीय सभागृहात १०० बेडच्या महा जम्बो सेंटरला मंजुरी मिळाली आहे. १५ ऑगस्टपर्यंत हे रुग्णालय सुरू होईल. तेथे शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत, असेही आमदार चव्हाण म्हणाले.
चौकट
हा तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज झालेल्या भेटीबाबत विचारले असता, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा हा प्रयत्न असावा, असे मला वाटते.
फोटो
पृथ्वीराज चव्हाण