सातारा : जिल्ह्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पण, पुढील आदेश येईपर्यंत शासकीय केंद्रावर लसीकरण होणार नाही. खासगी रुग्णालयात शुल्क देऊन होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सातारा जिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. आता १ मे पासून जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, सद्यस्थितीत संबंधित लाभार्थिंचे लसीकरण खासगी रुग्णालयात शुल्क देऊन होणार आहे. त्यासाठी लाभार्थिंनी लिंकवर नोंदणी करावी. त्यानंतर लाभार्थिंना लसीकरण तारीख आणि वेळ उपलब्ध होईल.
त्याचबरोबर सद्यस्थितीत पुढील आदेश येईपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे लाभार्थिंनी शासकीय केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
......................................................