आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा) , दि. १२ : खंडाळा येथील टपाल कार्यालयातील दुरवस्थेमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून हे टपाल कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. टपालाचे काम होत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला नाहक खेटे मारावे लागत आहेत.$ खंडाळा येथे तालुक्याच्या ठिकाणचे टपाल कार्यालय आहे. एका खासगी इमारतीत हे कार्यालय चालविले जाते. त्यासाठी काही वर्षांचा करार करण्यात आला होता. मात्र, हा करार संपुष्टात आल्याने घरमालकाने या कार्यालयाची वीज खंडित केली आहे. त्यामुळे इंटरनेट, संगणक चालू नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून टपालाचे कामकाज ठप्प आहे. टपाल कार्यालयाने तात्पुरती जनरेटरची सुविधा केली आहे. मात्र तेही बंद पडल्याने टपाल तिकीटे आणि पाकीटे विकण्यापलीकडे कुठलेही काम चालू नाही. याचा त्रास खंडाळ्यासह पंचक्रोशीतील जनतेला सहन करावा लागत आहे.नागरिक आणि पोस्टाचे कर्मचारी यांच्यात कामावरून रोजच वादावादी होताना पहायला मिळत आहे. अनेक जणांना पोस्टातून ठेवींच्या रक्कमा काढायच्या असतात पण विजेअभावी इंटरनेट सुरू नाही तर आम्ही तरी काय करणार? असे उत्तर लोकांना ऐकावे लागत आहे. पत्र टाकण्यासाठी टपाल पेटी जागेवर नाही त्यामुळे सर्वच बाजूंनी नागरिकांची हेळसांड होत आहे.$ याबाबत पोस्ट कार्यालयात चौकशी केली असता, खंडाळा टपाल कार्यालयातून वरिष्ठ कार्यालयाला भाडेकरार संपल्याबाबत व त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत माहिती देण्यात आहे. मात्र त्यावर अद्याप काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आम्हाला काहीच करता येत नसल्याचे सांगण्यात आले. टपाल विभागाच्या दुर्लक्षामुळे खंडाळयातील कार्यालय रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी सामान्य जनतेमधून होत आहे.
खंडाळ्यातील टपाल कार्यालय असून अडचण नसून खोळंबा
By admin | Published: June 12, 2017 12:36 PM