सातारा : ‘अजिंक्यतारा किल्ल्याला आमच्यासाठी काशी-विश्वेश्वराइतकेच महत्त्व आहे. या किल्ल्यावर छत्रपती शहाजीराजे यांच्यापासून ते शाहू महाराजांपर्यंत अनेकांचे पदस्पर्श लाभले आहेत. अशा मातृसंस्थेत छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा इतिहासकार अजय जाधवराव यांनी मंगळवारी व्यक्त केली.
सातारा शहराचे निर्माता छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक १२ जानेवारी रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावर झाला होता. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी हा दिवस ‘स्वाभिमान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त किल्ल्याच्या राजसदरेवर आयोजित कार्यक्रमात अजय जाधवराव बोलत होते.
स्वाभिमान दिनानिमित्त अजिंक्यताऱ्याचे प्रवेशद्वार सजवण्यात आले होते. शिवभक्तांचे स्वागत सनईच्या मंजूळ अशा स्वरांनी करण्यात आले. किल्ल्याला माथा टेकून शिवभक्त गडावर उत्सवाच्या ठिकाणी पोहोचत होते. मुख्य प्रवेशद्वाराला करण्यात आलेल्या फुलांच्या सजावटीने सर्वांचेच लक्ष वेधले. अजिंक्यताऱ्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली.
या उत्सवासाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, अॅड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजित बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक-अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, मनसेचे सातारा शहरप्रमुख राहुल पवार, भाजपच्या दीपा झाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १२ अजिंक्यतारा
साताऱ्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळवारी स्वाभिमान दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार व बुरुजांना फुलांची अशी सजावट करण्यात आली होती. (छाया : सचिन काकडे)