वडूज : वाहनचालकांसह पहाटेच्या पहरी पायी चालणाऱ्यांनाही गुडघा-गुडघा रस्त्यातील खड्ड्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शहरातील प्रमुख राज्यमार्ग रस्त्यांची ही अवस्था असेल तर इतर रस्त्यांची काय अवस्था असू शकते, याच कल्पनेतून खड्डा चुकवत सध्या सर्वसामान्यांचा प्रवास सुरू आहे. परंतु रस्त्यात चर काढल्यानंतर बुजवायची जबाबदारी त्यांचीच असताना त्या चरीचे गुडघाभर खड्डा होईपर्यंत संबंधितांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची डोळेझाक का? या चर्चेला उधाण आले आहे.
खटाव तालुक्याची राजधानी म्हणून वडूज नगरीचा नावलौकिक आहे. सुमारे ३० ते ३५ हजार लोकसंख्येत विखुरलेल्या वडूज शहराचा विस्तार विस्तृत झाला आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन पंचवार्षिक कार्यकाल संपत आला तरी, दैनंदिन सुविधा व्यतिरिक्त अपवाद वगळता कोणतीच भरीव कामे दिसत नाहीत. जुन्याच मुतारी पाडून नव्याने बांधून केलेली आर्थिक ओढाताण कशासाठी व कोणासाठी वास्तविक पाहता चौकाचौकांत मुतारीची सोय होऊन लोकांची गैरसोय दूर करणे क्रमप्राप्त होते. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते व त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरक्ष: चाळण झाली आहे. गत सहा महिन्यांपूर्वी नगरपंचायत प्रशासनाने चांगल्या दर्जाचा मुख्य रस्ता खोदून पाण्याची गळती होत असलेली मुख्य पाईपलाईन दुरुस्ती केली. मात्र, पाईपलाईनसाठी काढलेली चरीचे रूपांतर सहा महिन्यांत गुडघाभर खड्ड्याच्या स्वरूपात झाले. याच रस्त्यावरून पंचायत समिती सदस्य, कर्मचारी,तहसील कार्यालय, पोलीस ठाणे कर्मचारी नगरपंचायत पदाधिकारी आणि अधिकारी हे दररोज ये-जा करत असतात. मग ही डोळेझाक व अळीमिळी गुपचिळी का व कोणासाठी हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनाने प्रवास करताना नेमका कोणता खड्डा चुकवायचा या संभ्रम अवस्थेत वाहनचालकांची त्रेधा तिरपीट उडत आहे. तर यामुळे खड्ड्यातून जाताना मणक्यांचे विकार, पहाटे फिरणाऱ्यांचे प्रसंगी पाय मुरगुळून जखमी होणे यासह वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? असा यक्ष सवालही उमटत आहे.
चौकट
साहेब, जरा इकडे लक्ष द्या
वडूज-पुसेगाव मुख्य रस्ता, हुतात्मा हायस्कूल ते पेडगाव रस्ता, छत्रपती शिवाजी चौक ते दहिवडी रस्ता, बाजार पंटागण ते कातरखटाव रोड तसेच येरळा नदीवरील पुलाच्या रस्त्यावरील खड्ड्यांची मोजमाप करणे महाकठीण बनले आहे. म्हणूनच ‘साहेब जरा इकडेही लक्ष द्या,’ अशी आर्त मागणी वडूजकरांसह तालुक्यातील नागरिकांची जोर धरू लागली आहे.
२०वडूज
फोटो : वडूज तहसील कार्यालयासमोरच प्रमुख रस्त्यावर मोठी खड्ड्याची चर पडलेली आहे. (छाया : शेखर जाधव )