सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता हळूहळू बदलत असून, लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. पर्यावरणाला वाचविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे दिसून येत आहे. घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकडे लोकांचा कल वाढलाय. ‘ना आम्ही प्रदूषण करणार ना आम्ही उमाळे मुजवणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार’ असा निर्धार अनेकांनी केल्याचे दिसत आहे.
गणेशमूर्तींचे भक्तिभावाने दहा दिवसांनंतर विसर्जन केले जाते. आपल्या आजूबाजूला असलेले पाण्याचे स्रोत पाहून त्या ठिकाणी आपण गणेशमूर्तींचे विसर्जन करतो. पूर्वपर चालत आलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सध्याच्या तरुणाईकडून यात थोडा बदल होऊ लागलाय. सध्याच्या तरुणाईला पर्यावरण वाचले पाहिजे हे मनापासून वाटते. नुसते वाटतच नाही तर ही तरुणाई लागलीच कृतीही करून दाखवतेय. दरवर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलाशय, विहीर, तलाव प्रदूषित होत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जाताहेत, तसेच कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना प्रोत्साहित करून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असे सांगितले जातेय. त्या दृष्टीने अनेकांनी पावलेही उचलली आहेत. पहिल्या आणि पाचव्या दिवशी शहरात अनेकांनी घरच्या घरीच बादलीमध्ये पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन केले. ना गणेशभक्तांना मिरवणूक काढावी लागली ना तलावावर गर्दी करावी लागली. अत्यंत साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक विसर्जन अनेकांनी केले. भविष्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत आणखी जनजागृती होऊन घरगुती विसर्जनाकडे लोक वळतील, अशी यानिमित्ताने आपण अपेक्षा करूयात.
फोटो :