लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील १८ ते ४५ वर्षांतील नागरिकांना लस देण्याचे नियोजन सुरू असले तरी याला अनेक विघ्ने येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, आता आहे त्या लसीकरण केंद्रावर रांगा लागत आहेत. त्यातच १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणामुळे केंद्रावर मोठी गर्दी होऊन आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे. त्यामुळे शासनाने लसीकरण केंद्रे वाढवावीत, कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा आणि लसीचा साठा नियमित द्यावा, तरच हे शक्य होईल, असा सूर आरोग्य विभागातून उमटू लागला आहे.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करण्यात येऊ लागले. त्यासाठी जिल्ह्यात शासकीय आरोग्य केंद्रात आणि खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. शासकीयमध्ये मोफत लसीकरण आहे. पण, खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.
जिल्ह्यातील लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नियोजन केले. त्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. पण, अनेकवेळा कोरोनाची लस उपलब्धच होत नाही. त्यामुळे काही केंद्रे बंद ठेवावी लागतात. त्यामुळे नियोजन केलेल्या तारखेला काहीवेळा लसीकरण होत नाही. त्यातच आता एक मे पासून केंद्र शासनाने १८ ते ४५ वर्षांतील व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, हा निर्णय अनेक विघ्ने आणणारा ठरू पाहतोय.
जिल्ह्यात १८ ते ४५ वर्षांतील ११ लाखांवर व्यक्ती आहेत. या लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पण, यापूर्वीचा अनुभव पाहता आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाचाही कस लागणार आहे. कारण, जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. पण, पाहिजे तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. अनेकवेळा लसीसाठी वाट पाहत बसण्याची वेळ येते. तसेच आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा लागतात हे चित्र आहे. त्यातच १८ ते ४५ वर्षांतील नागरिकांचे लसीकरण हे अवघड ठरणारे आहे. कारण, लसीकरण केंद्रावर गर्दी वाढणार आहे. त्यातच लस उपलब्ध न झाल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्य विभागाकडे तेवढा स्टाफ नाही. आरोग्य केंद्रेही अपुरी पडणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य केंद्रे वाढवून लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्यास लसीकरण सुलभ होईल, असा विश्वास आरोग्य विभागाला आहे.
पॉईंटर :
- जिल्ह्यात एकूण लसीकरण केंद्रे ४४६
- शासकीय केंद्रे ४१९
- खासगी केंद्रे २७
- जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रात लसीकरण सुरू.
- ४ अर्बन हेल्थ सेंटरमध्ये सुविधा
.....
जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण
१८ ते ४५ वर्षांतील व्यक्ती ११०५३९१
- ४५ ते ५९ वर्षांतील ५२५९५३
- ६० वर्षांवरील ४०१८८४
.......................
आतापर्यंतचे लसीकरण
- एकूण लसीकरण ५३४५४४ नागरिकांना
- पहिला डोस ४६९१५१
- दुसरा डोस ६५३९३
..................................