दत्ता यादव।सातारा : एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे जशा पद्धतीने मृत्यू होणाचे प्रमाण वाढते. त्याच पद्धतीने आता अलीकडे अपघातामध्येही बळी जाण्याचे प्रमाण वाढतेय. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अनेकांचे संसार अक्षरश: उघड्यावर पडत आहेत. यामुळे आता अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले असून, या ठिकाणी प्रशासन उपाययोजना करेलच; परंतु आता नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे.
एखादी व्यक्ती अपघातामध्ये मृत्यू झाली तर हे नित्याचेच आहे. (नशिबात होतं) असं समजून आपण त्याकडे कानाडोळा करतो. इतकी नागरिकांची संवेदना आता बोथट होऊ लागली आहे. दोन्ही घटनांमध्येही व्यक्तीचा मृत्यूच झालेला असतो. मात्र, अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. जेवढ्या खुनामध्ये व्यक्ती मृत्यू झाल्या आहेत. त्यापेक्षा अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. कुणाचा भाऊ तर कुणाचा पती, वडील आई असे नातलग अपघातात मरण पावत आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं. यासाठी आता पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील सातत्याने अपघात होत असलेले ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. यावर पोलिसांनी अहवाल तयार केला असून, हा अहवाल महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, विभागाला सादर केला आहे.
येत्या काही दिवसांत या ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना नक्कीच होतील, अशा अपेक्षा करू या. मात्र, नागरिकांनीही आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. केवळ यंत्रणेवर बोट दाखवून गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे सतर्कता हाच सुरक्षित प्रवासाचा मूलमंत्र आहे.
ब्लॅक स्पॉट म्हणजे काय?ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे.
ही आहेत ब्लॅक स्पॉटशिंदेवाडी शिरवळ, शेंद्रे कारखाना, पेरले फाटा, उंब्रज, कोर्टी फाटा, मलकापूर फाटा, नारायणवाडी फाटा पाचवड, वाठार फाटा हॉटेल वैष्णवी कºहाड अशी जिल्ह्यात महामार्गावर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.काय उपाययोजना हव्या..फलक, बॅरिकेट्स, रबलिंग स्ट्रीप, वळण काढून टाकणे, झाडांच्या फांद्या काढणे यासह अन्य काही महत्त्वाच्या उपाययोजना जिल्हा वाहतूक शाखेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी स्वत: ब्लॅक स्पॉट अपघाताच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली.
शासकीय यंत्रणांनी ब्लॅक स्पॉटवर उपयायोजना केल्या आहेतच. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अनेक दुर्देवी घटना टळू शकतात.- संदीप भागवत, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा