महाबळेश्वर : दरड कोसळण्याच्या घटना व अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाडा कुंभरोशी या गावात अडकून पडलेले १९ पर्यटक अखेर महाबळेश्वरात सुखरूप दाखल झाले. सह्याद्री ट्रेकर्स व सारथी ग्रुपच्या सदस्यांनी या पर्यटकांना जंगलातील पायवाटेने महाबळेश्वरात आणले असून, स्थानिक प्रशासनाने वनविभागाच्या विश्रामगृहात सर्वांच्या निवासाची व्यवस्था केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या व रस्ता खचण्याच्या घटना घडू लागल्या आहे. अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हा घाटरस्ता चार दिवसांपासून वाहतुकीस बंंद ठेवण्यात आला आहे. बारामती, पुणे, सोलापूर येथील १९ पर्यटक काही दिवसांपूर्वी दापोली येथे पर्यटनासाठी गेले होते. दापोलीहून ते प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. याच वेळी महाबळेश्वर व पोलादपूर मार्गावरील घाटरस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णत: बंद झाली. त्यामुळे १९ पर्यटक प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा-कुंभरोशी या गावात अडकून पडले होते. वाडा-कुंभरोशी ग्रामस्थांकडून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे, संजय भोसले व सारथी ग्रुपच्या सदस्यांनी सर्व पर्यटकांना प्रशासनाच्या सहकार्याने महाबळेश्वरला आणण्याचे नियोजन केले. घाटरस्ता बंद असल्याने या पर्यटकांना जंगलातील पायवाटेने सुखरूप महाबळेश्वरला आणण्यात आले. ट्रेकर्सच्या सदस्यांनी सर्व पर्यटकांवर प्रथमोपचार केले. वनविभागाचे अधिकारी सहदेव भिसे व लहू राऊत यांनी हिरडा या वनविभागाच्या विश्रामगृहावर पर्यटकांच्या राहण्याची तर स्थानिक प्रशासनाने जेवणाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.
(चौकट)
पर्यटक पुणे, बारामती, सोलापूर येथील
सनसर (बारमती) येथील अरविंद मधुकर मुळीक, श्वेता अरविंद मुळीक, त्रिशा अरविंद मुळीक, स्वप्निल प्रभाकर जगताप, संगीता स्वप्निल जगताप, साई स्वप्निल जगताप, अनिकेत स्वप्निल जगताप, नितीन सुभाष खोपडे, अश्विनी नितीन खोपडे, स्वराज नितीन खोपडे, नितीन खोपडे, सोलापूर जिल्ह्यातील देगाव येथील पवन नवनाथ शिंदे, प्राजक्ता प्रवीण शिंदे, प्रशांत नवनाथ शिंदे, शिवानी प्रशांत शिंदे, पुणे येथील शुभी भगत, स्वप्ना देशपांडे, सिंग नेगी व मुकुल पाटील या पर्यटकांना महाबळेश्वरात सुखरूप आणण्यात आले.
फोटो : २५ अजित जाधव
वाडा-कुंभरोशी या गावात अडकून पडलेल्या पर्यटकांना रविवारी सह्याद्री ट्रेकर्स व सारथी ग्रुपच्या सदस्यांनी जंगलातील पायवाटेने महाबळेश्वरला सुखरूप आणले. (छाया : अजित जाधव)