वेळे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील ओझर्डे, बोपेगाव, गुळुंब या गावांत चोरट्यांनी बंद घरे फोडून रोख रक्कम व दागिने असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
गुळूंब (ता. वाई) येथील दीपक भिलार (वय ४३) यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्याने तोडून कपाटातील १५ ग्रॅमचा लक्ष्मीहार, ५ ग्रॅमची कर्णफुले, लहान मुलींच्या ५ ग्रॅमच्या रिंगा आणि रोख ८० हजार रुपये असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला, तर बोपेगाव येथील एका बंद घरात चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, शेजाऱ्यांची चाहूल लागताच चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.
ओझर्डे येथील वडा या परिसरामध्ये राहणारे अनिल पिसाळ यांचे वाई-वाठार मार्गावर घर आहे. पिसाळ यांच्या घरातील सर्व सदस्य कामानिमित बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पिसाळ यांच्या घराचे कुलूप तोडून १२ हजार रुपये रोख व लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील दागिने लंपास केले.
वाई तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वी वाई शहरालगत असलेल्या जेजुरीकर कॉलनीतील आठ घरे फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास अजून सुरू असतानाच भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळूंब, बोपेगाव व ओझर्डे या गावांतील बंद घरे फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो : २८ ओझर्डे रॉबरी
वाई तालुक्यातील ओझर्डे येथे चोरीच्या ठिकाणाचा भुईंज पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला.