सातारा : सेंट्रींगची कामे करत असताना होत असलेली आर्थिक परवड आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी मोटारसायकल चोर बनल्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या दोघा चोरट्यांनी दिली. संबंधित चोरट्यांकडून तब्बल २० दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. संदीप संजय चोरमले (वय २२, रा. फलटण), सुनील रामचंद्र माने (वय २३ रा. तावडी, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या दोघांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते. बनावट चावीचा वापर करून क्षणात हे दोघे दुचाकी लांबवत होते. या दोघांकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून या दोघांना अटक केली. सुनील मानेकडे पोलिसांनी चौकशी केली असता दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने फलटण, म्हसवड, विटा, माळशिरस, सांगली, कडेगाव बसस्थानक या ठिकाणाहून तब्बल २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकीने त्याने जवळच्या नातलगांजवळ ठेवल्या होत्या तर इतरांना विकल्या होत्या. तसेच काही दुचाकी त्याने घरामध्ये ठेवल्या होत्या. माने याने चोरलेल्या एकूण २० दुचाकीपैंकी एक दुचाकी टेंबुर्णी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात वापरली होती. ही दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. तर आणखी एक दुचाकी सांगोला पोलिसांनी जप्त केली आहे. अशा प्रकारे मानेकडून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. संदीप चोरमलेनेही शिरवळ, पुणे येथून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून एकूण २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत सहा लाख १० हजार रुपये आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, तानाजी आवारे, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, आनंदराव भोईटे, स्वप्नील शिंदे, विक्रम पिसाळ आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
सेंट्रिंगची कामे करणारे बनले चोर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2015 12:31 AM