म्हसवड : म्हसवडचे नगराध्यक्ष विजय सिन्हा यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक होणार की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले असतानाच अचानक या दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक तुर्तास पुढे गेली आहे. मात्र, यामुळे ‘दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ अशी परिस्थिती म्हसवडच्या राजकारणात निर्माण होणार की काय, असे वाटू लागले आहे.म्हसवड पालिकेच्या रिक्त नगराध्यक्षपदासाठीच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम दि. ६ रोजी जाहीर झाला; परंतु नगरसेवकांना अजेंडा सायंकाळी सहा नंतर मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे दि. ७ रोजी अर्ज भरण्याचे असल्याने चर्चा न करता दोन्ही नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची नगराध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला होता. यावेळी सत्ताधारी गटात फूट पडल्याची चर्चा सुरू असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आमदार जयकुमार गोरे यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन्ही इच्छुकांनी अर्ज मागे घेण्याविषयी सूचना केल्याचे समजते. तुर्तास जरी आमदार जयकुमार गोरे यांनी नगराध्यक्षपदाचा निवडीबद्दल पेच निर्माण झाल्यावर यशस्वी तोडगा काढला असला तरी येत्या काळात नगराध्यक्षपदासाठींचा उमेदवार सर्वानुमते निवडावा लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.सध्यातरी म्हसवड नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीपासून सत्ताधाऱ्यांपासून फारकत घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)नवीन कार्यक्रम जाहीर होईपर्यंत पूर्णविराम...नगराध्यक्षपदासाठी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक होणार की नाही याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. निवडणूक झाली असती तर घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर झाला असता? हे सर्व टाळण्यासाठी आ. गोरे यांनी नगराध्यक्षपद निवडीत निर्माण झालेला पेच अखेर सोडविला, अशी चर्चा आता सुरू आहे. आता तर त्यांनी यावर तोडगा काढल्याने सध्या तरी नगराध्यक्षपदाच्या चर्चेस नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत पूर्णविराम मिळाला आहे.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ?
By admin | Published: February 13, 2015 12:19 AM