दत्ता यादव ।सातारा : मराठा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर साध्या वेशात एक पोलीस कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हातात कॅमेरा घेऊन बसला. या कर्मचाºयाने मोर्चामध्ये दंगा करणाºया जमावाचे चित्रीकरण अगदी ‘झूम’ करून आपल्या कॅमेरात कैद केले. त्यामुळेच जमावाची धरपकड करण्यास हे चित्रीकरण पोलिसांच्या कामी आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर काही युवक प्रचंड दंगा करत होते. मोर्चामध्ये सहभागी झालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांनाही बोलू दिले जात नव्हते. आत्तापर्यंत एवढे मोर्चे निघाले. तेव्हा असा प्रकार घडला नाही.त्यामुळे इथे काही तरी काळेबेरे आहे, याची भणक साध्या वेशात तैनात असलेल्या पोलिसांना लागली होती. हे कोण आहेत? अशी पोलिसांनी तत्काळ जमावातील काहींकडे चौकशीही सुरू केली. परंतु जमाव ऐकण्याच्या आणि सांगण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर चित्रीकरण हाच आपला मुख्य दुवा असल्याचे पोलिसांना पटलं. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना आरडाओरड करणाºया जमावाकडे केवळ हताशपणे पाहत राहण्यापलीकडे काहीच करता येत नव्हतं. सगळी मदार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उंच ठिकाणी बसलेला पोलीस कर्मचारी अमोल धनावडेवर होती.धनावडेने आपले लक्ष इतरत्र न जाता केवळ आरडाओरड करणाºया जमावावरच केंद्रित केलं होतं. अधूनमधून काही पोलीस धनावडेला खुणेने सांगत होते. ‘चित्रीकरण नीट कर.’ आपले कर्तव्य धनावडेने खरोखरच उत्तमरीत्या पार पाडले. दंगा करणारे ‘खरे’ चेहरे ‘झूम’ करून त्याने आपल्या कॅमेºयात कैद केले. त्यामुळेच तोडफोडीच्या प्रकरणात पोलिसांना संबंधितांची धरपकड करता आली.एवढेच नव्हे तर महामार्गावर जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करणाºया युवकांचेही चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रीकरणही पोलिसांनी रात्री काही अटक केलेल्या जमावातील युवकांना दाखविले. त्यांच्याकडून ओखळ पटल्यानंतर आणखी काहीजणांची धरपकड करण्यात आली. यामुळे पोलिसांनाही पुरावा मिळाला.‘तो मी नव्हेच’ची दिली नाही संधी...पोलिसांनी चित्रीकरण पाहून जमावाची धरपकड सुरू केली. त्यावेळी अनेकांनी अहो, ‘मी तिथे नव्हतो,’ अशी पोलिसांकडे गयावया केली. परंतु पोलिसांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्यांना पोलीस ठाण्यात आणून चित्रीकरण दाखविले. त्यावेळी मग अशा लोकांचा पानउतारा झाला.