लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तृतीयपंथीयांनी रविवारी खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला. यावेळी भारावलेल्या सातारकर व तृतीयपंथीयांनी राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांना देशप्रेमाचेही धडे दिले.सामाजिक कार्यकर्ते आर. डी. भोसले व त्यांची पत्नी सुनीता यांच्या प्रयत्नाने झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सुनील काटकर, रवी साळुंखे, फारुख पटणी, अंजनी घाडगे व मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘सर्वांना जगण्याचा अधिकार असला पाहिजे, या भावनेतून रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला. या सर्वांना प्रेम दिल्याचा आनंद होत आहे.तृतीयपंथीयांच्या भावना व्यक्त करताना धर्म दान संस्थेचे प्रशांत वाडकर म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या वंशजासमोर देशाचे राष्ट्रगीत म्हणण्याचे भाग्य लाभले. जन्म घेताना आईचे हार्मोन्स आल्याने वागण्या-बोलण्यात फरक असला तरी तृतीयपंथीयांना वेगळी वागणूक दिली जाते. त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करता येत नाही. हजारो वर्षांपासून ते उपेक्षित आहेत. समाजातील वाईट घटनांबद्दल आम्हालाही चीड आहे. तरी आम्ही अन्याय सहन करतो. एड्समुक्त सातारा जिल्हा करण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत.’या कार्यक्रमाला उपस्थित तृतीयपंथीयांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमासाठी नाशिक, पुणे, बारामती, सातारा व कºहाड येथून रोहिणी, भारती, सारिका चव्हाण, वैशाली कदम यांच्यासह सुशिक्षित तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. चाळीस वर्षांपूर्वी अश्वपंथीय एकांकिकामध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारणारे कलाकार अभय देवरे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.आमचे उदयनराजे वाघासारखेमुंबई येथे तृतीयपंथीयांसाठी लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला होता. त्याला एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी आले होते, जणू काही त्यांना भीती असावी, असे वाटत होते; पण आमचे उदयनराजे भोसले हे या कार्यक्रमाला वाघासारखे आले. त्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला आहे, असे मनोगत प्रशांत यांनी मांडल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
तृतीयपंथीयांचा अनोखा फ्रेंडशिप डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:23 PM