बाळासाहेब रोडे - सणबूर , पाटण तालुक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय झाला आहे. त्याद्वारे विधानसभेसाठी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. यामुळे हिंदुराव पाटील व राहुल चव्हाण यांच्या हालचालीकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.तालुक्यात अनेक वर्षांपासून देसाई व पाटणकर गटांतर्गत राजकारण चालत आले अहो. येथे पक्षीय राजकारणाला थारा मिळाला नाही. दोन गटांतर्गत हा तालुका विखुरला होता. मात्र, १९९९ पासून तालुक्यात खऱ्या अर्थाने पक्षीय राजकारणाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली. यामुळे तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस शिल्लक राहणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस तालुक्यात राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पडत्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंद्दे समर्थक हिंदुराव पाटील यांनी काँग्रेसची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेऊन काँग्रेसला नवसंजिवनी देण्यासाठी प्रयत् न केले. यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक विभागात जाऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. १९९९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. म्हणून खचून न जाता त्यांनी पक्ष वाढविण्यास प्राधान्य दिले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वत: व पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. एवढ्यावरच न थांबता हिंदुराव पाटील यांनी पंचायत समितीत काँग्रेसचा सभापतीही करुन दाखविला. शंभुराज देसाई यांनी पाटण तालुका विकास आघाडीची स्थापना करुन काँग्रेसची युती केली. व पाटणकरांची पंचायत समितीवरील सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत हिंदुराव पाटील यांनी सावध पवित्रा घेऊन शंभुराज देसाई यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये ते यशस्वीही झाले. तेव्हापासून हिंदुराव पाटील तालुक्यात ‘किंग मेकर’ची भूमिका बजावत आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुराव पाटील यांची भूमिका काय असणार आहे, याकडे आतापासूनच तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. पाटण तालुक्यात सध्या शंभुराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर यांचा कलगितुरा आरोप प्रत्यारोपाला उधाण आले आहे. तालुक्यातील राजकारण केवळ नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपावर न थांबता पंचायत समितीतील कामावरुन अधिकाऱ्यांनाही त्यात ओढले जात आहे. त्यामुळे येथील जनता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
‘पाटण’मध्ये तिसऱ्या पर्यायाची चाचपणी
By admin | Published: July 08, 2014 11:43 PM