वाई : वाईला प्राचीन इतिहास लाभला आहे. त्यात नव्याने उजेडात येत असलेले वाई परिसरातील संशोधन यामुळे वाईच्या इतिहासात नवनवीन अज्ञात असलेली पाने जोडली जात आहेत. त्यात अजून एक पान जोडले गेले. रविवार पेठेतील परटाचा पार येथे तेराव्या शतकातले गद्धेगळ आढळून आले आहे.गद्धेगळ ही शिळा म्हणजे एकप्रकारे शापवाणी मानली जाते. वीरगळी प्रमाणेच गद्धेगळाचा उगम हा शिलाहार कालीन आहे. गद्धेगळ ही शिळा शिल्प जास्त करून शिलाहार व यादव यांच्या राजवटीत कोरण्यात आली आहेत. एकदा राजा जमीन दान करतो, ही जमीन कोणी बळकावून घेऊ नये आणि ही जमीन बळकावून घेतलीच तर राजाज्ञा मोडली म्हणून त्याची गय करणार नाही हे दर्शवण्यासाठी गद्धेगळ कोरले जाते.
गद्धेगळचा दगड हा आयताकृत असून, यावर गाढव स्त्रीशी संभोग करताना दाखवलेले असते. कोणी दिलेल्या दानाचा दुरूपयोग केला किंवा नियम मोडला तर काय शिक्षा होईल हे सांगणारे हे शिळा शिल्प आहे. शिळेच्या वरच्या बाजूस सूर्य, चंद्र आणि मध्ये कलश कोरलेला असतो. ह्या सूर्य, चंद्रचा अर्थ असा होतो की जोपर्यंत ह्या सृष्टीवर चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत दान दिलेल्या राजाची कीर्ती आसमंतात कायम राहील. ते हे वरील तीन शिल्प सांगता.
वाईला ऐतिहासिक वारसास्कंदपुराणांतर्गत कृष्ण माहात्म्यात वाईचा उल्लेख वेराजक्षेत्र असा आढळतो. विराटनगर म्हणूनदेखील वाईला ओळखले जाते. किवरा ओढा काठी मिळालेले क्षुद्राष्म हत्यारे, वरवंटा, पाटा, खापरे हे निवडक अवशेष प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवते. किवरा ओढा म्हणजे आताचे रविवार पेठ येथील पूर्व बाजू. यावरून जुनी वाई ही आताचे रविवार पेठ. दुसरे म्हणजे वाई परिसरातील किल्ले आणि मंदिरे. किल्ले हे शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधलेले आहेत.
संशोधन कार्य गेले ६ वर्ष सुरू आहे. यामध्ये नवीन गोष्टीचे संशोधन सुरू आहे. वाई येथील मंदिरे, लेण्या, गडकिल्ले, वीरगळ, वाडे, समाधी ह्या विषयावर आपले संशोधन चालू आहे. हळूहळू अजून इतिहासाचे ज्ञात अज्ञात पाने उघडली जातील. - सौरभ जाधव, इतिहास संशोधक, मंदिर स्थापत्य अभ्यासक