लोकमत न्यूज नेटवर्कमायणी : पैशाच्या देवाण-घेवाणीतून मायणी येथील दादा उर्फ हरीश बबन साठे (वय ३०) या तृतीयपंथीयाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. मात्र, काही तासांतच पोलिसांनी घरात सापडलेल्या रक्ताच्या डागावरून दोघा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दादा साठे या तृतीयपंथीयाचा धारदार शस्त्राने गळा चिरून मृतदेह गुरुवारी रात्री फुलेनगर रस्त्यावरील चाँद नदीच्या कडेला विवस्त्र अवस्थेत टाकण्यात आला होता. हा प्रकार शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर मायणीमध्ये खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दादा साठेचा कोणी खून केला? याबाबत पोलिसांना कसलीही माहिती नव्हती. पोलिसांनी गावामध्ये कसून चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी रात्री दादा साठेसोबत बापू महादेव पाटोळे (२९, रा. मायणी) असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बापू पाटोळेच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी पाटोळेची आई घरात सांडलेल्या रक्ताचे डाग पुसत होती. त्याचवेळी पोलिस घरात गेले. रक्ताचे डाग पाहून बापू पाटोळेवरील संशय पोलिसांचा अधिक बळावला. त्यानंतर त्याच्या शोधासाठी हवालदार राघू खाडे, अरुण बुधावले, संदीप हनवटे यांचे पथक रवाना झाले. त्यावेळी खानापूर तालुक्यातील कार्वे येथे बापू पाटोळे या पथकाच्या हाती लागला. त्याला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर खून करताना त्याच्या सोबतीला गणेश पाटोळेही (४०, रा. मायणी) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गणेशलाही ताब्यात घेतले. बापू पाटोळे हा काहीही काम करत नव्हता. नेहमी दारूच्या नशेत असायचा. या प्रकारातूनच त्याने हा प्रकार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयितांनी दादा साठेला उसने पैसे दिले होते. यातून हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत असले तरी या प्रकरणामध्ये अनैसर्गिक कृत्य आहे का, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.दरम्यान, या घटनेनंतर विविध संघटनांनी एकत्र येऊन या खुनाची नि:पक्षपाती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांनी भेट दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी अधिक तपास करीत आहेत.रक्ताच्या डागावरून आरोपीचा शोध !दादा साठेचा खून झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बापू पाटोळेच्या घरात ज्यावेळी पोलिस गेले. तेव्हा पाटोळेची आई शेणाने घरात सारवत होती. पोलिसांनी त्यांना विचारले असता काहीतरी चिकट आहे. ते सांडले आहे म्हणून मी शेणाने सारवत आहे, असे सांगितले. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता गादीवर आणि कपड्यावर रक्त दिसले. त्यामुळे दादा साळेचा खून बापू पाटोळेनेच केल्याचा संशय बळावला. त्याच्या ‘मोबाईल लोकेशन’वरून खानापूर तालुक्यात त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.