सातारा : मान्सून संपला, परतीचा पाऊस गेला. पण, यंदा पावसाबरोबरच धरणातील पाणीसाठाही रुसला आहे. कारण, प्रमुख सहा प्रकल्पात ११७ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्केही भरलेली नाहीत. त्यातच जिल्ह्यातील धरणातील पाणी सोडण्यावरुन संघर्ष पेटू लागल्यामुळे दुष्काळी स्थितीची दाहकता समजून येत आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे. पूर्व भागात तर दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे. यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही पाण्याची तरतूद केलेली आहे. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे.पण, यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात १०० टक्के पाणीसाठा झालेला नव्हता. आतातर आणखी परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. परिणामी आहे त्या साठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
उरमोडीत अवघा ५७ टक्क्यांवर साठा..सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात उरमोडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.९६ टीएमसी इतकी आहे. पण, या धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी धरण भरलेच नाही. सध्या तर ५.७१ टीएमसीच साठा शिल्लक आहे. म्हणजे धरणात ५७ टक्क्यांवर पाणी आहे. त्यातच या धरणातील पाण्यावर सातारा तालुक्याबरोबरच माण आणि खटाव तालुक्यातील पिण्याचे पाणी आणि शेती पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. धरण भरले नसल्याने आवर्तनावर परिणाम होणार आहे.
येरळवाडीत शुन्य टक्के साठाखटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १.१५ टीमएसी आहे. पावसाअभावी धरणसाठा झालाच नाही. सध्या या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. त्यातच या धरणावर खटावमधील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून असतात. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या उग्र स्वरुप धारण करणार आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे -गतवर्षी - यावर्षी - यंदाची टक्केवारी - एकूण क्षमताधोम - १३.०३ - ११.१४ - ८२.५३ - १३.५०कण्हेर - ९.५४ - ७.१८ - ७१.७० - १०.१०कोयना - ९९.९३ - ८५.६० - ८१.३३ - १०५.२५बलकवडी - ४.०५ - २.६७ - ६४.४३ - ४.०८उरमोडी - ९.९४ - ५.७१ - ५७.३१ - ९.९६तारळी - ५.४९ - ५.२३ - ८९.३८ - ५.८५