सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडलेला. पण, यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. त्यातच पावसाचा अजून दीड महिना बाकी असल्याने धरणे भरु शकतात. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला १ हजार ८३ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. तसेच नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. तर सध्या कोयना धरणातील पाणीसाठा ८८ टीएमसीवर पोहोचला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सुरूवातीच्या अडीच महिन्यातच चांगला पाऊस झालेला. त्यानंतर परतीच्या पावसानेही हुलकावणी दिलेली. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे ७५ टक्केच पाऊस झाला होता. कोणत्याही तालुक्याने वार्षिक सरासरी गाठली नव्हती. परिणामी पश्चिम भागातील कोयनेसह बहुतांशी प्रमुख धरणे भरली नव्हती. तसेच पूर्व भागातील पाझर तलावातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्हावासीयांना आठ-नऊ महिने दुष्काळाशी सामना करावा लागला. यंदा मात्र, जिल्ह्यावर वरुणराजाने कृपा केली आहे.मान्सूनचा पाऊसच जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरतो. यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जूनमधील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात केली. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणी झाली आहे. तसेच मोठ्या प्रकल्पातही पाणीसाठा वाढला. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात ४४ टक्के अधिक पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख प्रकल्पात ८० ते ८७ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा झालेला आहे. सध्या या धरणात सुमारे १२५ टीएमसी साठा आहे. त्यातच पावसाचा अजून दीड महिना आहे. यामुळे धरणे भरु शकतात.मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक झाले आहे. गेल्यावर्षी १० आॅगस्टपर्यंत कोयनानगर येथे ३ हजार १६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा ४ हजार २४४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यातच अजूनही कोयना धरणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाच हजार मिलिमीटचाही टप्पा पार होऊ शकतो. तर नवजा येथे आतापर्यंत ५ हजार ३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत नवाजला ५११ मिलिमीटर अधिक पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरलाही आतापर्यंत ४ हजार ७६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत महाबळेश्वरला ५८२ मिलिमीटर अधिक पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे कोयनेसह प्रमुख धरणांतीलही पाणीसाठा वेगाने वाढला आहे.
कोयनेत साडे पाच टीएमसी साठा अधिक..मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने कोयना धरण पूर्ण भरलेले नव्हते. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, गतवर्षी ९४ टीएमसीवरच साठा झालेला. यंदा मात्र, आताच धरणात ८८.६५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यातच सध्या पाऊस कमी असलातरी धरणात आवक सुरूच आहे. अजूनही पाऊस होणार असल्याने धरण भरणार आहे. कोयनेत गतवर्षीच्या तुलनेत ५.६७ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.
२४ तासांत महाबळेश्वरला ५३ मिलीमीटर पाऊस..जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. तर सध्या पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २०, नवजाला २३ आणि महाबळेश्वरला ५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.