सातारा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराकडे यंदा शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळते. शिक्षक दिन होऊनही अद्याप पुरेसे प्रस्ताव न आल्याने पुन्हा एकदा शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. अशा शिक्षकांना जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या कार्यक्रमामुळे शिक्षकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांच्या मध्ये अधिक जोमाने काम करण्याची इच्छा निर्माण होते. सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तर आदर्श शिक्षकांची निवड करून त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान केले जातात.सन २०२४-२५ मध्ये जिल्हास्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी विहित संख्येने प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. विहित संख्येएवढे प्रस्ताव प्राप्त होण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्तावांची मागणी करण्यात येत आहेत. शिक्षकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून जिल्हास्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी नंतर जाहीर करण्यात येईल.
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहनजिल्हा पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेले अर्ज कमी आहेत. काही ठिकाणी तर अर्जच न आल्याने अर्ज करणाऱ्यांनाच यंदा पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. पुरस्कारासाठी अर्ज आल्यानंतर त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षकालाच हे पुरस्कार देण्यात यावेत या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागाला शिक्षकांकडून पुन्हा अर्ज मागविण्याचे आदेश दिले आहेत.