नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या बनगरवाडीतील ग्रामस्थांना आज टँकरने पाणीपुरवठा होतोय. तर दुष्काळामुळं शेतकऱ्यांनी छावणी जवळ केलीय. कोणी वसईला मजुरीसाठी तर मेंढपाळ मराठवाड्यात गेलेत. त्यामुळे अर्ध्या गावाने स्थलांतर केल्याचे दिसत आहे.माण तालुक्यातील इतर दुष्काळी गावाप्रमाणेच बनगरवाडी हे एक गाव. हे गावही उंचावर वसलेलं आहे. गावचा परिसर माळरानात मोडणारा. बनगरवाडीची लोकसंख्या १४५८ तर एकूण क्षेत्र १३५१ हेक्टर. त्यापैकी जवळपास ७५० हेक्टर हे बागायतीत मोडते, तर उर्वरित माळरानच. गाव परिसरात १६० विहिरी, मोठे पाझर तलाव ९, माती नालाबांध २, ओढ्यावर सिमेंट बंधारे २ आहेत. या गावातील २५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ मेंढपाळ आहेत.सतत पडणाºया दुष्काळामुळे ग्रामस्थांनी गेल्यावर्षी जलसंधारणाचे काम हाती घेतले. वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गाव परिसरात काम करण्यात आलं आणि गावच्या या कामाला यशही आलं. बनगरवाडी गावचा वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक आला. तर जलसंधारणाच्या कामाच्या दरम्यान गेल्यावर्षी १८ मे रोजी वळवाचा पाऊस झालेला. या पहिल्याच पावसात बनगरवडीतील काही भागातील रानमाळं, शेततळी भरली होती. विहिरी तुडुंब झालेल्या. ओढ्याला पाणी वाहिलेले. त्यानंतर २२ जूनला एकदा पाऊस झाला. त्यामुळे बनगरवाडीला जलसंधारणाचे महत्त्व समजलं. त्यानंतर येथील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिके घेऊन चांगले पैसेही मिळवले; पण त्यानंतर मान्सून व परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळाचं चित्र निर्माण झालं आहे.सद्य:स्थितीत बनगरवाडीतील अर्ध्याहून अधिक ग्रामस्थ हे स्थलांतरित झालेत. मेंढपाळांनी मराठवाडा जवळ केलाय. शेतकºयांनी छावणीतच मुक्काम ठोकला आहे. तर काहींनी मजुरीसाठी वसई जवळ केलीय. येथील लोक अधिक करून मेंढपाळ आणि मजुरीच करतात. सध्याच्या दुष्काळामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलंय. आता घरी फक्त लहान मुलं आणि वृद्ध आहेत. त्यांचीही पाणी मिळवण्यासाठी फरफट सुरू झालीय. दिवसदिवसभर वाट बघूनही टँकर येत नाही. पाणी मिळाले तर ते पुरेसे होत नाही, अशी स्थिती. सर्वांनाच पाण्याचाच एक घोर लागलेला. कधी एकदा पाऊस पडतो, असं होऊन गेलंय.बनगरवाडीतील मुलंही वृद्धांच्या आधाराने कसंबसं दिवस ढकलत आहेत. पाऊस पडल्यानंतरच त्यांची आई-वडिलांबरोबर भेट होईल. तोपर्यंतचा एक-एक दिवस ढकलणं जीवावर येऊन गेलंय.एक कोटीवर उत्पन्नगेल्यावर्षी मे आणि जूनमध्ये दोन पाऊस झाले होते. त्यामुळे गाव परिसरात बºयापैकी पाणीसाठा झाला होता. या पाण्याच्या भरवशावरच शेतकºयांनी विविध पिके, भाजीपाला घेतलेला. त्यातून जवळपास एक कोटीहून अधिक रुपये बनगरवाडीतील शेतकºयांच्या हातात पडलेले; पण आता दूरदूर पाहिले जर हिरवं पीक कोठेही नजरेस पडत नाही, अशी स्थिती आहे.
तुडुंब झालेली बनगरवाडी पाण्यासाठी मोताद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:12 PM