सातारा : ‘इडी, आयकर विभाग, इतर सरकारी यंत्रणा आणि तुरुंगापासून दूर राहण्यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून काहीजण गेले आहेत. यामागे केवळ स्वाऱ्थ आहे. आम्ही महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिली.याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे की, भाजप हा लोकशाहीवादी पक्ष नाही. त्यांची लोकशाहीवर कसलीही निष्ठा नाही. त्यांच्यामागे आरएसएसची छुपी कार्यपध्दती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता या संविधानातील मुलभूत सिध्दांताना त्यांचा विरोध आहे. लोकशाही साधनांचा वापर करुन त्यांनी दिल्लीची सत्ता मिळवली. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चाणक्य नितीचा ते सतत वापर करत आले आहेत. यासाठी काही वाटेल ते करायची त्यांची तयारीही आहे.देशात २०२४ ची निवडणूक होईल असे वाटत नाही. जरी झालीतरी पारदर्शी होईल असे नाही. अशातच अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह नऊजण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यांचा भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आपल्या गुरुला आणि दैवताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत. सहा महिन्यांतच त्यांना महाराष्ट्रातील एससी, एनटी, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजाच्या दारात यावे लागणार आहे. राज्यातील जनता सूज्ञ आहे याचाही त्यांनी विचार करावा, असा इशाराही या पत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे.