सातारा : ‘ज्या लोकांना इनोव्हेटिव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगता येणार नाही, त्यांनी आमच्या इनोव्हेटिव्ह सातारा या उपक्रमाविषयी बोलू नये. आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करुन दाखवावेत,’ असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरिताच आजपर्यंत जीवन व्यतित केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते, म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे, हा त्यांचा स्थायीभाव बनला आहे. लोकांच्या गतिमान सोयी, सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे.
भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करून आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहिलेला आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बॅँकांचे विलिनीकरण केले.तरीही उजळ माथ्याने फिरणाऱ्या सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरिकांनी पाहिला आहे. म्हणून बेछूट, बेताल आरोप करून, त्यांचा सुरू असलेला चारित्रहननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही, असेही पत्रकात नमूद केले आहे.