सणबूर (जि. सातारा) : ढेबेवाडी येथील ग्रामिण रूग्णालयासमोर उघड्यावर कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायत अनेकदा कचरा उचलुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो रूपये खर्च करत असताना काही ग्रामस्थ त्याठिकाणी पुन्हा जाणिवपुर्वक कचरा टाकत आहेत. त्यामुळे शाळा परीसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असुन डासांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ढेबेवाडी बाजारतळावर झाडाच्या बाजुला उघड्यावर कचरा टाकला जात होता. त्यामुळे बाजारतळाला कचरा डेपोचे स्वरुप आले होते. कचºयामुळे दुर्गंधी पसरुन डासांचा पादुर्भाव वाढत होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पंचायत कचरा उचलण्यासाठी दरमहा हजारो रुपये खर्च करत होती. मात्र त्याठिकाणी पुन्हा कचºयाचे ढिग लागत होते.
शेवटी पंचायतीने त्याठिकाणी कचरा उचलुन संपुर्ण परिसर स्वच्छ करुन पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला. व त्याठिकणच्या झाडाना कट्टे बांधल्याने तिथे खेळण्यासाठी चिमुकल्यांचा वावरही वाढला. तो परिसर आता स्वच्छ झाल्याने उघड्यावर कचरा टाकणे बंद झाले आहे. तर पाण्याची टाकी बांधल्याने बाजारात येणाºया ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. मात्र ग्रामिण रूग्णालयासमोर अजुनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असुन पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
शाळेतील लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . पैसे खर्च करुन पंचायतीकडुन कचरा उचलला जात असुन कचरा टाकणाºयावर कारवाईचे फलकही लावण्यात आले होते. मात्र, पुन्हा मागचे पाढे पंचावन्न अशी स्थिती असुन कोणालाच कशाचे काही गांभिर्य नसल्याचे वास्तव समोर आले आहे. नविन गावठाणातही हिच स्थिती आहे. वारंवार त्याठिकाणी कचरा टाकला जात आहे. पोलिस ठाण्यासमोरील रस्त्याशेजारी अशीच स्थिती आहे. उघड्यावर कचरा टाकल्याने परिसराला अवकळा पसरत आहे. गाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी पंचायतीने स्वच्छता अभियान प्रभाविपणे राबवणे गरजेचे आहे.गावात स्वच्छता रहावी यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे. मात्र ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे. ग्रामपंचायतीने प्रयत्न केले तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनीच स्वच्छतेसा ठी पुढाकार घ्यायला हवा. - संजय पाटील,उपसरपंच, ढेबेवाडी