दहिवडी : सलग चौथ्या वर्षी माण तालुका हरित करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. तालुक्यात २०१७ पासून आजअखेर जवळपास १५ लाख इतके वृक्षारोपण झाले आहे. जवळपास ८० टक्के झाडे जगविण्यात माणवासीयांना यश आले आहे. तालुक्याला या वृक्षलागवडीचा फायदा झाला असून सरासरी साडेतीनशे मिलिमीटर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढून दुप्पट झाले. दोन वर्षांत आठशे मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्याने तालुक्याने टँकरमुक्तीकडे वाटचाल केली आहे.
येथील १०५ महसुली गावांपैकी ९० पेक्षा जास्त गावांना टंचाई जाणवत होती. वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून कोट्यवधी लिटरचे पाणी अडवल्याने अपवादात्मक परिस्थिती वगळता एकही टँकर लागला नाही. स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांना झाड लावणे बंधनकारक होते. त्यातून जवळपास पावणेदोन लाख झाडे लावण्यात आली. या चळवळीला सहकार्य म्हणून ड्रीम सोशल फाउंडेशन यांनी १५ हजार फळझाडे उपलब्ध करून दिली. तसेच दोन कंपन्यांनी २५ हजार झाडे दिली. सिद्धनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून आंबा व नारळाची प्रत्येक सभासदाला १ अशी १० हजार झाडे वाटली. विशेष म्हणजे या वर्षात अनेक सभासदांना स्वतःच्या झाडाचे आंबे खायला मिळाले.
तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. ३ लाख २४ हजार ४०८ झाडे लावण्यात आली. त्यानंतर हरियाली योजना, भरगच्च वर्गीकरण, राष्ट्रीय वर्गीकरण, संयुक्त वनव्यवस्थापन कॅम्प या योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या वर्षी एक लाख ८९ हजार ९२५ तर पुढे अनुक्रमे १२ हजार व ३३ हजार अशी जवळपास सात लाख ९० हजार झाडे वनविभागाने स्वतःच्या जागेवर लावली.
सामाजिक वनीकरण विभागाने ग्रामपंचायत गावठाण बांधकाम विभाग त्यांच्या जागेवर तसेच विविध योजनांतून तीन लाख झाडे लावली. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराईच्या माध्यमातून, तर सुनील सूर्यवंशी यांनी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून हजारो झाडे जगविली आहेत. सातारा-पंढरपूर महामार्गालगतही संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून ११ हजार झाडांची नुकतीच लागवड केली आहे. बिहार पॅटर्नच्या माध्यमातून अनेक गावांत दुतर्फा झाडांची लागवड चालू आहे. माण ग्रीन चळवळीला बिदालने लोकवर्गणी काढून २० हजार झाडे जगविली.
चौकट
प्रशासनाचा हातभार
प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, दादासाहेब कांबळे, शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार सुरेखा माने यांनी त्यांच्या कारकिर्दीत ग्रीन माणसाठी चळवळ उभी केली. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, आयएएस अधिकारी मल्लीकनेर, प्राधिकरण आयुक्त डॉ. नामदेव भोसले, आयकर आयुक्त डॉ. नितीनजी वाघमोडे यांच्यासह अनेकांनी हातभार लावला.
चौकट
लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आजपर्यंत झाडे लावायचे. त्यानंतर दुर्लक्ष व्हायचे; पण अलीकडील काळात ९० टक्के झाडे जगविण्यात यशस्वी झालो आहे. माण हिरवा झालेला लवकरच बघायला मिळेल.
- अजित पवार,
समन्वयक, माण तालुका ग्रीन प्रोजेक्ट.
फोटो
१८दहिवडी
बिदाल येथील पूर्वीच्या ओसाड डोंगरावर आता हिरवीगार गर्द झाडे दिसत आहेत.