मायणी : माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी अथक प्रयत्नाने टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मायणी ब्रिटिशकालीन तलावात आणले मात्र या तलावातून रोज हजारो लीटर पाण्याची गळती होत आहे, हे वाया जाणारे पाणी थांबवण्याची गरज आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने तसेच गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. शेतीला पाणी सोडल्यामुळे या तलावाची पाणी पातळी घटली होती.
त्यानंतर गेली दोन दशके टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मायणी परिसरात मिळावे, यासाठी डॉ. येळगावकर यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले व गत महिन्यामध्ये या तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पूर्वीच्या पाणीसाठ्यात वाढ होत असतानाच या तलाव्याच्या तट भिंतीशेजारी शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी असलेल्या जॅकवेलमधून व जॅकवेलच्या खालील बाजूला हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने पाहून पावसाळ्यापूर्वीच या जॅकवेलमधून व जॅकवेलच्या खालील बाजूतून वाया जाणारे पाणी थांबवण्याची गरज आहे. हे वाया जाणारे पाणी सध्या चांद नदी पात्रातून जात आहे. मात्र, या पात्रातील बहुतांशी बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे हे वाया जाणारे पाणी थांबविण्याची मागणीही परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून होत आहे.
०९मायणी
मायणी तलावाच्या जॅकवेलमधून पाणी वाया जात आहे. (छाया : संदीप कुंभार)