मलकापूर : मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध करत मंगळवारी कोल्हापूर नाक्यावर चक्काजाम करण्याचा निर्धार मराठा समाजाच्या रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. मोर्चाप्रमाणेच आदर्श आचारसंहितेचे पालन करत मराठा बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने चक्काजाममध्ये सहभागी व्हावे, असे अवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजाने राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. चार महिन्यांत शासनाकडून मागण्यांबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. अशा दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध करत मंगळवारी रस्त्यावर उतरून राज्यभर चक्काजाम करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत मंगळवारी कोल्हापूर नाका येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आदर्श आचारसंहितेचे पालन करत ११ ते २ या वेळेत चक्काजाम करण्याचा निर्धार करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच स्वयंस्फूर्तीने फलक, बॅनर व भगवे झेंडे घेऊन मराठा बांधवांनी सहभागी व्हावे, असे ठरविण्यात आले. सहभागी आंदोलनकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांसह दोन रुग्णवाहिका व शेकडो स्वयंसेवक तैनात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.त्याचबरोबर चक्काजाम आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांनी पार्किंग समस्या विचारात घेऊन शक्यतो दुचाकी वाहनांचाच वापर करावा, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. भजन, पोवाड्यांसह मराठा समाजाच्या मागण्यांबाबत घोषणा देण्याबरोबरच ज्या पद्धतीने लाखोंचे मोर्चे शांततेच्या मार्गाने यशस्वी केले. तशाच पद्धतीने हे चक्काजाम आंदोलन शांततेत करून एक इतिहास घडविण्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी समितीच्या वतीने करण्यात आले. (प्रतिनिधी)
हजारो मराठा बांधव उद्या आंदोलनात
By admin | Published: January 29, 2017 10:45 PM