सातारा : कोविडमुक्त झालेला एक व्यक्ती दोन जणांना प्लाझ्मा देऊन त्यांना कोविडविरुद्ध लढण्यासाठी मदत करू शकतो. मात्र, कोविडच्या विस्फोटानंतर रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मांचाही वाणवा भासू लागला आहे. कोरोनामुक्त झालेल्या साताऱ्यातील ७४ हजारांहून अधिक रुग्णांची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र, त्यांचा रक्तगट न घेण्याच्या आळसामुळे हजारो पेशंट प्लाझ्माला मुकले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी सातारा जिल्ह्यात कोविडच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांना बेड मिळविण्याबरोबरच आता प्लाझ्मा मिळविण्यासाठीही नातेवाइकांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा नाममात्र उपलब्ध असतो. नातेवाइकांना प्लाझ्मा घेण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडूनही दूर जावे लागल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात कोविडवर मात करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७४ हजारांच्यावर आहे. यातील अवघ्या १० टक्के लोकांनी जरी प्लाझ्मा दान केले असते तर जिल्ह्याची गरज भागवून इतरांनाही प्लाझ्मा देता आला असता.
कोविड रुग्णांची माहिती घेऊन त्याची शासन दरबारी नोंद करण्यासाठी तयार असलेल्या यंत्रणेच्या डेटाबेसमध्ये रुग्णांच्या रक्तगटाचा उल्लेखच नाही. गाव, पत्ता, फोन नंबर याची माहिती घेतांना रक्तगटाच्या रकान्याचा समावेश केला असता तर संबंधित रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी संपर्क साधणं अधिक सोपे झाले असते. पण आणखी एक रकाना भरायचा त्रास नको या कातडी बचाओ धोरणामुळे हजारो रुग्णांची तडफड होत असल्याचे भानही या सरकारी बाबूंना नाही, असे खेदजनक चित्र पहायला मिळते.
चौकट :
कोण करू शकते प्लाझ्मा दान?
कोविड पूर्ण बरा झाल्यावर किमान २८ दिवसांनी लक्षणविरहित राहिलेले व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतात. कोविड लशीचा दुसरा डोस घेऊन किमान २८ दिवस पूर्ण झालेल्या आणि १८ ते ६५ वर्षे वय असणारे आणि किमान ५५ किलो वजन असणाऱ्या व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतात. रक्तदानाइतकीच सोपी असलेली ही प्रक्रिया ९० मिनिटांत पूर्ण होते. काढलेल्या रक्तातून फक्त प्लाझ्मा वेगळा करून घेतला जातो. लाल रक्तपेशी दात्याच्या शरीरात परत पाठविल्या जातात. त्यामुळे प्लाझ्मा दान करणाऱ्यांना कसलाही त्रास होत नाही.
कोट :
कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना ज्येष्ठ आणि नाजूक अवस्थेतील रुग्णांच्या शरीरात प्लाझ्मा युद्ध सैनिकांचे काम करते. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७४ हजारांहून अधिक आहे. या सर्वांचेच रक्तगट शासनाकडे असते तर कदाचित रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मासाठी आंतरराज्य हेलपाटे मारावे लागले नसते. शासन यंत्रणेला हे काम वाढीव वाटत असेल, तर याची माहिती संकलनाची जबाबदारी आम्ही स्वीकारायला तयार आहे.
- प्रशांत मोदी, कोविड डिफेंडर ग्रुप, सातारा
पॉईंटर :
प्लाझ्मा दान करणारे वयोगट : २१ ते ४५
प्लाझ्मा दात्याचे वजन : ५५ किलोपेक्षा अधिक
जिल्ह्याची प्लाझ्माची गरज : दिवसाला ३० ते ४० रुग्ण
....................