कऱ्हाड : शहरासह उपनगरे झपाट्याने विस्तारतायत. माळरानावरही प्लॉटिंग होऊन अपार्टमेंट उभी राहतायत. सध्या शहर परिसरात शेकडो अपार्टमेंट व वसाहतींची संख्या वाढली आहे; पण या अपार्टमेंटमधील फ्लॅट आणि खोल्या कोणालाही भाडेतत्त्वावर दिल्या जातायत. भाडेकरूची कसलीही माहिती न घेता त्याच्या हाती फ्लॅटच्या चाव्या सोपविल्या जात असून, पोलिसांच्या सूचनेलाही बगल दिली जात असल्याचे दिसते.
कऱ्हाडात अपार्टमेंट, चाळी, घरांची संख्या झपाट्याने वाढली. शहरासह त्रिशंकू भाग, विद्यानगर, मलकापूर, वारुंजी, कापील, गोळेश्वर, कार्वे रोडवर गेल्या पाच वर्षांत प्रचंड बांधकामे झाली आहेत. खोल्यांची संख्याही अमर्याद वाढली असून, भाड्याने फ्लॅट घेऊन राहणारेही उदंड झालेत. शहराच्या चारही भागांत झपाट्याने वाढ झाल्याने शहराचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. वाढत्या बांधकामांवर ग्रामपंचायती, नगरपंचायती, पालिका यांच्यासह प्रशासनाची बारीक नजर आहे; पण तेथे वास्तव्यास येणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. कोणीही यावे आणि कामापुरते भाड्याने राहून जावे, अशी शहराची अवस्था झाली आहे. याचाच गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेऊ लागलेत. चोऱ्या, घरफोड्यांची मालिका गेल्या सहा महिन्यांत शहराच्या हद्दीत सुरू आहे. अपवाद वगळता चोऱ्या, घरफोड्यांचा छडा लावण्यात पोलीसही अपयशी ठरल्याचे दिसते. भरदिवसा घरफोड्यांचे अनेक प्रकार घडले असून, त्यातून लाखोंचे साहित्यही गायब झाले आहे.
परप्रांतीयांनी कºहाडात येऊन चोऱ्या केल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून जे प्रयत्न केले जातात, त्यापैकी भाडेकरूंच्या नोंदी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहत वेगवेगळ्या भागात घरमालक, भाडेकरू यांच्या बैठका घेतल्या होत्या. ज्यांच्या नोंदी नसतील त्यांना नोंदी करण्यास भाग पाडले जात होते. सध्याही पोलिसांकडून असे प्रयत्न होतायत. मात्र, त्याला प्रतिसाद दिला जात नाही. भाडेकरू नोंदीचा मुद्दाच नागरिकांच्या विस्मरणात गेला असल्याचे दिसते.
- चौकट
सहज मिळतोय निवारा !
कºहाड शहरासह वारुंजी, विद्यानगर, वाखाण, मलकापूर परिसरात भाडेतत्त्वावर राहण्यासाठी कोणीही खोल्यांची चौकशी केली असता त्यांना सहजपणे खोल्या मिळतात. भाडेकरूची नोंद पोलीस ठाण्यात करावी लागते, हेच अनेकांना माहिती नाही. तसेच पोलिसांची भानगड नको, असे म्हणूनही अनेकजण टाळाटाळ करतात.
- चौकट
अर्ज उपलब्ध; पण मिळकतधारकांची अनास्था
एखादा गुन्हा घडल्यास अर्जातील माहितीचा पोलिसांना उपयोग होऊ शकतो. त्यादृष्टीनेच पोलिसांनी भाडेकरू नोंदीचा अर्ज तयार केला असून, त्यावर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना संबंधित भाडेकरूची सर्व माहिती मिळू शकते. कºहाड शहर पोलीस ठाण्यातही अशाप्रकारे नोंदी घेतल्या जातात; पण नागरिकांच्या अनास्थेमुळे त्यामध्ये सातत्य नसल्याचे दिसते.
- चौकट
सर्वच भाडेकरू संशयित नसतात; पण...
भाडेतत्त्वावर खोली किंवा फ्लॅट घेऊन राहणारे अनेकजण नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी येथे स्थायिक झाले आहेत. प्रत्येकजण चुकीच्या प्रवृत्तीचा आहे, असे नाही; पण ठराविक जणांमुळे इतरांचीही गैरसोय होते.
- चौकट (फोटो : १५केआरडी०६)
कायदा काय सांगतो
१) फौजदारी संहितेतील कलम १४४ अन्वये नोकर, सुरक्षारक्षक आणि भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
२) माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये दंड किंवा शिक्षेची तरतूद
३) कायद्यात घरमालकासह भाडेकरूवर गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद
४) भाडेकरू कोण आहे, किती दिवस राहणार आहे, त्याचा व्यवसाय, मूळ पत्ता, राहण्याचा उद्देश याची नोंद अर्जात असावी.
५) भाडेकरार सबरजिस्ट्रारकडील नोंदणीकृत असावा, असे बंधन नाही. त्या माहितीचा उपयोग एखादा गुन्हा घडल्यास होतो.
६) भाडेकरूला नोंदीचा अर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
फोटो : १५केआरडी०५
कॅप्शन : कृष्णा-कोयना नदीकाठी वसलेल्या कऱ्हाडचा विस्तार झपाट्याने होत आहे. (संग्रहित छायाचित्र)