स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : धूम्रपान, तंबाखू, जर्दा, खर्राच्या सेवनाने दरवर्षी हजारो लोकांचा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे मृत्यू होत असतो. या दुष्परिणामाच्या जाणिवेतून सातारा जिल्ह्यातील १ हजार ४९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी ‘माझे घर, माझा परिसर आणि माझे गाव तंबाखूमुक्त राहावा अन् इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी प्रयत्न करेन,’ अशी शपथ घेऊन व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांर्तगत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होण्यासाठी आपला परिसर आणि शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त होण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (दि. २६ जानेवारी रोजी) जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था व कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तंबाखूमुक्त शपथ घेण्याचे प्रशासनाकडून आदेश दिले.त्यानुसार गावोगावी ग्रामसभा घेण्यात आल्या. यावेळी आशा, महिला स्वास्थ कार्यकर्ता व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित महिला व ग्रामस्थांनी तंबाखूला नकार देऊन तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
हजारो लोकांची तंबाखूमुक्तची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:25 PM