महाबळेश्वर : सरत्या वर्षाला निरोप अन् नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दिग्गज राजकारणी, सिनेअभिनेते, उद्योगपतींसह हजारो पर्यटक महाबळेश्वरात दाखल झाले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती अंबानी, पिरामल, जिंदाल, बजाज यांच्यासह अनेकांचा यात समावेश आहे.
महाबळेश्वरची गुलाबी थंडी, सूर्योदय, सूर्यास्ताचे मुंबई पॉईंट, विल्सन पॉईंटसह लॉडविक पॉईंट आदी ठिकाणी दिसणारे विहंगम दृश्य पर्यटक डोळ्यांत साठवत आहेत. ऑर्थरसीट, केट्स पॉईंट्ससारख्या प्रेक्षणीय स्थळांवर जत्रेचा माहोल आहे. कॅनॉटपीक, प्लेटोसारखा हिरवागार गालिचा पांघरल्यासारखी सदाहरित प्रेक्षणीय स्थळे अनेकांना खुणावतात. हौशी पर्यटक, प्रामुख्याने नवविवाहित दांपत्ये प्रेक्षणीय स्थळांवर वेळ घालवताना दिसतात. वेण्णालेक चौपाटीवर असलेली खाद्यपदार्थांची रेलचेल, घोडेसवारी बालचमूंसाठी विविध खेळांची दुकाने अन् सायंकाळी सूर्यास्तावेळी थंडीत नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबडच उडते.
कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच वेण्णालेक नौकाविहारासाठी प्रवेश दिला जात आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे. पर्यटकांची नोंद, तापमान, ऑक्सिजन तपासूनच प्रवेश दिला जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असलेली लाईफ जॅकेट्स तेथेच निर्जंतुक करणे, विना मास्क आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी एक पथक तैनात केले आहे.
फोटो ३१महाबळेश्वर
महाबळेश्वर येथील बॉम्बे पॉईंटवर हजारो पर्यटकांनी गुरुवारी सरत्या वर्षातील मावळत्या सूर्याला निरोप दिला. हा क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. (छाया : अजित जाधव)