कऱ्हाड : वनअधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आगाशिव डोंगरावरील ४ हजार १७० झाडे पाण्याअभावी जळून जात असून, संबंधित झाडांना पाणी देण्यासाठी उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या आणि पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित झालेल्या आगशिव डोंगरावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक संस्था व पर्यावरणप्रेमींनी येथील वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनासाठी पाठबळ दिले आहे. वनविभागाच्या हद्दीत हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. परंतु त्यांच्या संगोपनाकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्या पाऊस नसल्याने जमिनीमध्ये ओलावा नाही. त्यामुळे या परिसरातील झाडे जळून जात आहेत. आगाशिव डोंगरावरील वृक्ष संपदा पाण्याअभावी धोक्यात आली असतानाही वन विभागाकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसून येत नाही. तसेच जागोजागी पक्षी व जनावरांसाठी पाण्याचे टँक बांधलेले आहेत. त्यामध्ये सुध्दा पाणी नाही. सध्या झाडे १५ ते २० फूट उंच झाली आहेत, परंतु ती पाण्याअभावी वाळत असून, त्वरित लक्ष न दिल्यास ती नष्ट होतील.त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आगाशिव डोंगरावरील झाडांना पाणी देण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना करावी अन्यथा सोमवार, दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मनसेच्या पत्रकात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत वनविभागाला देण्यात आली असून, त्यावर जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपाध्यक्ष महेश जगताप, तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
‘आगाशिव’वरील हजारो वृक्ष होरपळले
By admin | Published: September 06, 2015 8:35 PM