सातारा : व्हॉट्सॲपवरील स्टेट्समुळे अनेकदा वादावादीचे प्रसंग घडत असतात. असाच काहीसा प्रकार फलटण येथे घडला असून, धमकीचा व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याने एका हमालाला कोयत्याने वार करून जखमी केले. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रेम जाधव (वय ३०, रा. सोमवार पेठ, फलटण) हा फलटमध्ये हमालीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या मोबाइलवर धमकीचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने काहीजणांची नावे घेतली होती. त्यामुळे त्याच्यावर चिडून असलेल्या संबंधितांनी प्रेमवर हल्ला केला. तो घरात जेवत असताना त्याला बाहेर बोलावून घेण्यात आले. त्यानंतर रवी पवार (रा. फलटण) याने कोयत्याने प्रेम जाधवच्या उजव्या डोळ्याच्या वरील बाजूस मारून त्याला गंभीर जखमी केले. तर इतरांनी त्याला घरातून बाहेर ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हे सर्वजण सोमाशेठच्या पाया पड नाहीतर तुझा मर्डर करणार, असे म्हणते होते. या हल्ल्यात प्रेम जाधव हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर फलटणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी लहू पुजारी जाधव, रवी पवार, रुपेश पवार, साहील पवार, तुषार जाधव, सतीश जाधव, अविनाश जाधव, गणेश जाधव (सर्व रा. फलटण) यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.