सातारा : येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीचा बसस्थानक परिसरात विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाई तालुक्यातील पीडित युवतीने आकाश जाधव (रा. देगावफाटा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित युवती ही वाई तालुक्यातील असून ती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिकण्यास आहे. त्या युवतीस तिच्या मैत्रीणीच्या ओळखीचा असलेल्या आकाश जाधव हा सतत मला तू आवडेस, तू मला हो म्हण, असे म्हणून त्रास देत होता. मात्र, पीडितेने त्याला याबाबत पुन्हा न बोलण्याची ताकीद दिली होती. तरीही आकाश तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता.
दि. १८ रोजी पीडित युवती परीक्षा असल्याने महाविद्यालयात निघाली होती. त्यावेळी आकाशने तिला बसस्थानक परिसरात थांबवले व ह्यमला तुझ्याशी काही बोलायचे आहेह्ण, असे म्हणून त्याने तिचा हात ओढला. त्यामुळे चिडलेल्या युवतीने त्याच्या कानाखाली दिल्याने तो त्याठिणावरून निघून गेला.
मात्र, त्यानंतर त्याने तिला फोन करून आपण भेटूया, मला सगळा हिशोब बरोबर करायचा आहे, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित युवतीने या घटनेची माहिती बहिणीला दिल्यानंतर तिने आकाशला फोन करून याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करून दमदाटी केली.
अखेर भीतीपोटी हा सारा प्रकार अखेर पीडितेने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी आकाशला फोन करून मुलीला त्रास न देण्याबाबत तंबी दिली. परंतु त्याने त्यांनाही शिवीगाळ करून लवकरच सगळे हिशोब केले जातील, अशी धमकी दिल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार संशयितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करत आहेत.