फलटण : ऑलिम्पिक मध्ये तिरंदाजीत स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव याने त्याच्या कुटुंबियाला काही जण त्रास देत असून धमक्याही दिल्या असल्याचे सांगितल्याने याबाबत शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.हरियाणा येथे सराव करीत असलेल्या प्रवीण जाधव यांनी तेथे पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितले, की सरडे (ता. फलटण) गावातील एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली.
जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे. याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. माझ्या शेजाऱ्यांना घरापुढून एक वेगळा मार्ग हवाय. त्यावर आम्ही त्यांना होकारही दिला होता. मात्र, आता त्यांनी हद्द केलीय.
त्यांनी माझ्या कुटुंबीयांना धमकी देण्यास सुरुवात केली असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे, असेही त्याने सांगितले आहे.
ऑलिम्पिकमधून परतल्यावर भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेले असून तिथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत.
प्रवीण पुढे म्हणाला, माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होत असून मी तिथे त्यांच्या सोबत नाही. याबाबत मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललोय, असेही त्यांने सांगितले. याप्रकरणी कुटुंबीयांनी सातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.
या तक्रारीची अद्याप पोलिसात नोंद झाली नसली तरी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सरडे येथे जाऊन या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे