ढेबेवाडी : ढेबेवाडी ते पाटण घाटमार्गावर अचानक दरड कोसळून तिघेजण दरडीसह दरीत फेकले गेले. त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवशी घाटात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सचिन बापूराव पाटील (वय ४०, रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी विभागात बुधवारी रात्रीपासून चालू झालेली पावसाची संततधार गुरुवारी दिवसभर कायम होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विविध मार्गांवरील फरशी पुलांसह मोठे पूलही पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या लोकांची घराकडे जाताना तारांबळ उडाली होती. मंद्रुळकोळे येथील सचिन पाटील हे पाटण येथील एका सहकारी पतसंस्थेत काम करतात. ते दिवसभराचे कामकाज संपवून पाटणवरुन मंद्रुळकोळेनजीक पोहोचले. मात्र, पुलावर पाणी असल्याने पुन्हा घाटमार्गे कऱ्हाडहून गावाकडे येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार ते घाटातून जात असताना मरळीनजीक रस्त्यावर झाड पडले होते. सचिन पाटील यांच्यासह शैलेश कदम (रा. मरळी), दत्तात्रय सुतार (रा. केळोली) यांनी ते झाड रस्त्यातून हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पाण्याच्या लोटाबरोबर मोठी दरड कोसळली. यामध्ये हे तिघेही दरीत फेकले गेले. रात्री उशिरा स्थानिक ग्रामस्थ, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने शैलेश कदम आणि दत्तात्रय सुतार यांना बाहेर काढण्यात यश आले. ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सचिन पाटील यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी दरीत सापडला.
फोटो : २३ सचिन पाटील
कॅप्शन : मृत सचिन पाटील