लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दरवर्षी गणेश उत्सवाचे आगमन झाल्यानंतर रस्त्यामध्ये मांडवासाठी खोदण्यात येणारे खड्डे नंतर कोण मुजविणार, असा प्रश्न पडत असतो. अनेकदा विसर्जन झाल्यानंतर खड्डे तसेच राहतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर सर्व स्थरातून टीका होत असते. यंदा मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘लोकमत’ने गणेश मंडळांना ‘आपले खड्डे आपणच मुजवू या...’ असे आवाहन केले आहे. ‘लोकमत’च्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘आम्ही काढलेले खड्डे आम्हीच मुजविणार,’ असा निर्धार अनेक गणेश मंडळांनी केला आहे.सातारा शहरामध्ये दरवर्षी २४६ सार्वजनिक गणेश मंडळे गणेशाची प्रतिष्ठापना करतात. शहरातील प्रत्येक पेठांमध्ये आणि गल्लीबोळामध्ये गणेश मंडळे मंडप उभारत असतात. रस्त्याच्या रुंदीवरून मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली जाते. काही ठिकाणी पाच ते वीस फुटापर्यंत रस्त्यात मंडप उभारले जातात. हे मंडप उभारण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते खड्डे खोदत असतात. परंतु, गणेश विसर्जन झाल्यानंतर खड्डे तसेच असतात. त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना याचा नाहक त्रास होत असतो. जेव्हा कधी पालिकेचे टेंडर निघेल तेव्हा हे खड्डे सवडीने मुजविले जात होते.ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्यामुळे याला कोणी फारसा विरोधही केला नाही. मात्र, रस्त्यात खड्डे पाहून पालिका आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर नागरिकांमधून तीव्र टीका व्हायची. या गोष्टीला कुठेतरी पायबंद बसावा व कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून, सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना विजर्सन झाल्यानंतर खड्डे मुजविण्याचे आवाहन केले आहे.रस्त्यांची चाळण;आपली जबाबदारीसातारा शहरामध्ये जवळपास २४६ मंडळे आहेत. या प्रत्येक मंडळांकडून मंडप उभारण्यासाठी १४ ते १५ खड्डे खोदले जातात. म्हणजेच सर्व गणेश मंडळांचा मिळून हा आकडा तब्बल साडेतीन हजारांच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले जात असल्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण होत असते. त्यामुळे पालिकेने या खड्डयांवर मलमपट्टी करण्याऐवजी गणेश मंडळांनीच खड्डे मुजविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.सातारा शहर परिसरात आजपर्यंत झालेल्या अपघातांमध्ये बहुतांश मंडळी केवळ खड्ड्यांमुळेच जखमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘खड्डेमुक्त सातारा’साठी शहरातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळे ‘आपले खड्डे आपणच मुजवू या...’ या मोहिमेत नक्की सहभागी होतील.सातारा शहरातील बहुतांश रस्ते दोन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांची मजबुती टिकविण्याची जबाबदारी आता सातारकरांचीच असल्याने ‘आपले खड्डे आपणच मुजवू या...’ ही मोहीम यशस्वी होणे काळाची गरज बनली आहे.
मंडळांचे साडेतीन हजार खड्डे; बोलायला ठेवू नका हो मुद्दे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:06 PM