गेल्या सहा महिन्यांत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतला रस्ता अशी शंका यावी एवढी वाईट स्थिती महामार्गाची झाली आहे. सातारा ते पुणे या दरम्यान या रस्त्यावर तब्बल साडेतीन हजारांपेक्षा अधिक खड्डे आहेत. या महामार्गावर सरासरी रोज एक अपघात होत आहे. महामार्गावर टाकलेले दगड आणि खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी एकतर माणसाची हाडे खिळखिळी करते किंवा गाडी निकामी करते. सध्याची महामार्गाची स्थिती, वसूल होणारा टोल आणि मिळणाऱ्या सुविधा, प्रवाशांना काय हवे या सर्वांचा ऊहापोह करीत आहोत ‘लोकमत’च्या असुविधांचा ‘महा’मार्ग या वृत्त मालिकेच्या माध्यमातून...प्रगती जाधव-पाटील।
सातारा : महामार्ग म्हटलं की गुळगुळीत आणि सरळ रस्ता ही संकल्पना अनेकांच्या मनात असते. या संकल्पनेला उभा-आडवा छेद दिलाय तो खेडशिवापूर ते आनेवाडी टोलनाका रस्त्याने. या महामार्गावर तब्बल ३४६८ खड्डे असून, उंटसवारीचा अनुभव कोणाला घ्यायचा असेल तर वाहनचालकांनी या रस्त्याने एकदातरी नक्कीच प्रवास करावा!
वडाच्या झाडांच्या मध्यातून जाणारी डांबरी सडक हे २० वर्षांपूर्वीच्या सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चित्र होते. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसने या प्रवासाला साधारण तीन ते साडेतीन तास लागायचे. सातारा-पुणे अप-डाऊन करणाऱ्यांची संख्या त्यामुळे कमी होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पुणे-शेंद्र्रे (सातारा) महामार्ग चौपदरीकरणाचे काम झाले. त्यानंतर पुढे शेंद्रे ते कागल (कोल्हापूर) या अंतराचे चौपदरीकरण राज्य रस्ते विकास महामंडळाने केले. देशभरातील प्रमुख महामार्गांचे सहापदरीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने जाहीर केली आणि त्यात पुणे ते शेंद्रे हा रस्ता बसविण्यात आला. मात्र, गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सहापदरीकरण रेंगाळले आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलाय, पर्यायी रस्ता नाही. जो आहे तो खड्ड्यांमुळे जीवघेणा बनलाय. त्यातच वाहतुकीची कोंडी सर्व गणित बिघडवते आहे.
गेल्या काही महिन्यांत पावसाने खराब झालेला रस्ता, डायव्हर्शन, पुण्यातील कोंडी, टोलनाक्यावरील दोन-दोन किलोमीटरच्या रांगा, आदींमुळे या प्रवासाचा वेळ दुपटी, तिपटीने वाढला आहे. शुक्रवार, शनिवार पुण्याहून सातारा, सांगली, कोल्हापूरला यायला बस मिळत नाहीत. प्रवासाइतकाच वेळ स्टँडवर तिकीट मिळविण्यासाठी ताटकळावे लागते. रविवारी-सोमवारी पुण्याकडे जाताना हेच चित्र पाहायला मिळते.
दुपारी घरातून बाहेर पडलेला कुटुंबातील सदस्य तिन्हीसांजेच्या आत चहाला पुण्यातील ठिकाणावर पोहोचत असे. आज हाच सदस्य किती वेळात पोहोचेल आणि तो सुरक्षित असेल का? याची शाश्वती नाही. सणवार, सुट्टीच्या दिवसांत प्रत्येकालाच आपल्या घराची ओढ असते. नेमकं याच रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा काळ असतो.‘डायव्हर्शन’ने प्रकल्पाचा उद्देशच ‘डायव्हर्ट..!२००४ पूर्वी साताºयाहून पुण्याला जाण्यास तीन ते साडेतीन तास लागत होते. चौपदरीकरणाने हा प्रवास सुकर झाला. प्रवासाचा वेळ अवघ्या दोन तासांवर आला. सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. ठिकठिकाणी रस्त्याचे ‘डायव्हर्शन’ झाले आणि प्रकल्पाचा उद्देशच ‘डायव्हर्ट’ झाला, असे म्हणण्याची वेळ आली.
धोकादायक ठिकाणेपुणे ते सातारा
- खेडशिवापूर येथील वर्ये -शिवरे गाव -खेलाडी फाटा -कापुरहोळ -राजगड कारखान्यासमोर धांगवडी -टिकवी सारोळ्याचा पूल- शिंदेवाडी फाटा -लॉकिम फाटा -शिर्के कंपनी फाटा -फूलमळा -शिरवळ पोलीस ठाण्यासमोरील मार्ग -पंढरपूर फाटा -चौपाळा -धनगरवाडी मोटे वस्ती -केसुर्डी फाटा -पारगाव कमानीसमोर -जुना टोलनाका -घाटातील दत्तमंदिर-सातारा-पुणे एस कॉर्नर -अजनुज फाटा -बेंगरूटवाडी कॉर्नर -शिरवळ पुणे स्टॉप
- रस्त्याचे अंतर १४० किलोमीटर
दिवाळीच्या सुट्टीत पुण्याहून सातारला यायला तब्बल पाच तास लागले. सोबत असेल्या तान्ह्या लेकरांचे खूपच हाल झाले. रस्त्यांची दुरवस्था आणि टोल नाक्यावरील चुकीचं व्यवस्थापन याचा हा परिणाम असल्याचं मला जाणवलं.- संदीप महाडिक, पुण्यातील सातारकर