सातारा: पाचवड-वाई मार्गावरील आसले गावच्या हद्दीत परप्रांतीय प्रवाशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना भुईंज पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात एका महिलेचा समावेश असनू, तिचा पोलिस शोध घेत आहेत.
पटेल बर्रट आदिवासी (वय ३३, रा. ग्रामकुडो, ता., जि. कटणी, राज्य मध्यप्रदेश), धोला बदोसकार पारधी (वय २९, रा. बदोश लाल पारधी, पारधी मोहल्ला, ग्राम बिरुहल्ली, ता. रिठी, नितारा, जि. कटणी, मध्यप्रदेश), चनक सुनिबेक मरावी (वय २९, रा. रुनीबेग मरावी, ग्राम कुडो, जि. कटणी, मध्य प्रदेश) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचवड-वाई मार्गावरील आसले हद्दीतील पुलाजवळ शुक्रवारी (दि. ९) रात्री आठ ते नऊच्या सुमारास एक परप्रांतीय व्यक्ती उभी होती. त्या ठिकाणी एक महिला व तिघेजण गेले. त्यांनी संबंधित परप्रांतियाला उसाच्या शेतात नेऊन त्यांच्याकडील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यामध्ये दोन मोबाइल, सोन्याची कुंडल, सोन्याचा गुरू मनी, रोख रक्कम व कागदपत्रे, असा १ लाख ६७ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, रत्नदीप भंडारे, पोलिस अंमलदार नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, राजेश कांबळे यांचे एक पथक तयार करण्यात आले.
या गुन्ह्याचा या पथकाने पंधरा ते वीस ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरून संशयितांच्या ठिकाणाची अखेर या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंंज पोलिसांच्या पथकाने वाई तालुक्यातील परखंदी येथून वरील तिघांना बुधवारी (दि. १४) रोजी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून तपास केला असता, संशयितांनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाइल व आणखी चार मोबाइल, तसेच पिवळ्या धातूचे ४९२ कॉइन, असा सुमारे ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोन्याची बनावट नाणी सापडली.. या प्रकरणात अटक केलेल्या तिघांची पोलिसांनी चौकशी केली जात असता त्यांच्याकडे सोन्यासारखी दिसणारी बनावट नाणी सापडली. स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखवून ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखा किंवा भुईंज पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.