सातारा : ‘आम्हाला तडीपार का केले,’ असे पोलिसांना विचारत सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवार, दि. ११ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता वाईपोलिस ठाण्यासमोर घडली. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तिघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सारंग ज्ञानेश्वर माने (वय २४), अक्षय गोरख माळी (२१), वसंत ताराचंद घाडगे (१९, रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, ता. वाई), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या तिघांना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. हे माहीत झाल्यानंतर हे तिघेही वाई पोलिस ठाण्यासमोर आले. येताना त्यांनी प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल आणले होते. ‘आम्हाला तडीपार का केले,’ असे पोलिसांना विचारत त्यांनी अंगावर पेट्रोल ओतले.हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी वेळीच धाव घेऊन तिघांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिस काॅन्स्टेबल धीरज नेवसे यांच्या तक्रारीनुसार सारंग माने, अक्षय माळी आणि वसंत घाडगे या तिघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार लेंभे हे अधिक तपास करीत आहेत.
Satara: ‘आम्हाला तडीपार का केले’ विचारत अंगावर ओतले पेट्रोल; वाई पोलिस ठाण्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 3:52 PM