राजू पिसाळ पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी सह परिसरातील शेतातील मोटर केबल चोर तिघा चोरट्यांना औंध पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित संजय गोसावी (वय-१९), वैभव सत्यवान लगाडे (२१), उदय संजय पाटोळे (२२, सर्व रा. वडूज ता. खटाव जि.सातारा) असे संशयित आरोपींची नावे आहे.याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून शेतातील मोटर केबल चोरीस जात होत्या. याप्रकरणी औंध व वडूज पोलिस ठाणे येथे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तपासासाठी पोलिसांनी पुसेसावळी ते वडूज रोडवर अचानक नाकाबंदी केली. दरम्यान, रोहित गोसावी हा संशयित आढळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीकडून औंध पोलीस स्टेशनकडील सात व वडूज पोलिस स्टेशनकडील एक असे एकूण आठ चोरीचे गुन्हे उघड झाले. दरम्यान त्याचे साथीदार वैभव लगाडे, उदय पाटोळे यांना ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली टू व्हीलरसह ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.पी. दराडे, पोलिस उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस फौजदार बापुसाहेब जाधव, सुभाष डुबल, पोलिस हवालदार राहुल वाघ, राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव, पंकज भुजबळ, किरण जाधव यांनी केली.
Satara Crime: तिघा केबल चोरट्यांना औंध पोलिसांनी केले जेरबंद, ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 6:39 PM