नागठाणे : आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आसनगाव (ता. सातारा) येथील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक हणमंत पवार (वय २६) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी महेश संपत पवार, गणेश संपत पवार, संपत आण्णा पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आसनगाव (ता. सातारा) येथे सोमवार, ११ जानेवारी रात्री ८ वाजता गावातील दत्त मंदिरासमोरील रस्त्यावर महेश पवार, गणेश पवार, संपत पवार यांनी संगनमत करून दीपक पवार हा घरातील एका महिलेस काहीतरी बोलला असा संशय घेऊन त्यास मारहाण केली. त्यावेळी शंकर पवार तसेच गावचे सरपंच आणि रामचंद्र आप्पा पवार हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता तिन्ही आरोपींनी सरपंच आणि रामचंद्र पवार यांना ढकलून दिले आणि फिर्यादी शंकर पवार यांना लाकडी दांडक्याने हातावर मारहाण केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी दीपक पवार यास गावाबाहेरील गाव माळ येथे रात्री ९.३० वा. सुमारास घेऊन गेले आणि त्याठिकाणी त्याला पुन्हा खोऱ्याने मारहाण केली तसेच आरोपींनी त्या महिलेस समोर बोलावून दीपक तुला काय बोलला, असे विचारले. त्यावेळी तिने काही बोलला नाही असे सांगितले. तरीही तिन्ही आरोपींनी संशय घेऊन दीपक यास परत मारहाण करून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक पवार हा रात्री घरी आला नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा गावात शोध घेतला असता त्याने गावच्या हद्दीतील आरसाड शिवारातील जांभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. आरोपींकडून रात्री त्यास झालेली मारहाण आणि त्यास दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आणि त्याने आत्महत्या केली, हे यातून निष्पन्न होत आहे. याबाबतची फिर्याद चुलते शंकर साहेबराव पवार (वय ४४, रा. आसनगाव) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.