सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘मोरया’चा गजर सुरू असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि त्या जयघोषातच टाहो मिसळले. सातारच्या राजपथावरील इमारतीची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोमवारी रात्री तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. इमारतीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला, तरी डॉल्बीच्या दणदणाटामुळे ही भिंत कोसळल्याचीच चर्चा शहरात अधिक आहे.चंद्रकांत भिवा बोले (वय ६४, रा. समर्थ मंदिरजवळ, सातारा), उमाकांत गजानन कुलकर्णी (६२, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) आणि गजानन श्रीरंग कदम (रा. करंजे पेठ, सातारा) अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी नीलकंठ भिसे (४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक ऐन रंगात आली असताना साडेअकराच्या सुमारास राजपथावरील सिटी पोस्टानजीक असलेल्या एका इमारतीची भिंत अचानक कोसळली. या भिंतीजवळच बोले यांचा वडापावचा गाडा उभा होता. या गाड्याशेजारी गप्पा मारत उभे राहिलेले कदम आणि कुलकर्णी यांच्यासह बोलेही क्षणार्धात ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आणखीही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मिरवणुकीची धामधूम सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे गणेशभक्तांची प्रचंड धावपळ उडाली. पोलिसांनी विसर्जन मिरवणूक तत्काळ मार्गी लावून बचावकार्य सुरू केले. मिरवणुकीतील मंडळांचे कार्यकर्तेही मदतीला धावले. (प्रतिनिधी) काळाने आधीच दिला होता इशारा!सातारा : राजपथावरील सुमारे १०५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ इमारतीचा काही भाग कोसळला होता. जणू पुढे होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेचा इशाराच मागील महिन्यातील तुफान पावसात मिळाला होता. यानंतर पालिकेने इमारत मालकाला नोटीसही दिली होती. (अधिक वृत्त पान २ वर)इमारत केली जमीनदोस्तसोमवारी रात्री दुर्घटना घडल्यानंतर सोमवारी रात्रीच पालिकेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झाला आणि ही धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.त्यासाठी आलेला खर्चही इमारतीच्या मालकांकडूनच वसूल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० आॅगस्टला साताऱ्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानंतर ११८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात लांजेकर यांचाही समावेश होता. डॉल्बीमुळेच भिंत कोसळलीमिरवणुकीतील डॉल्बीच्या हादऱ्यांमुळे भिंत कोसळल्याची चर्चा रात्रीपासूनच नागरिकांत आणि सोशल मीडियात सुरू झाली. तथापि, इमारतही मोडकळीस आली होती आणि पालिकेने ती पाडण्याची नोटीस बजावली होती, हेही नंतर समोर आले.याप्रकरणी इमारतीचे मालक वसंत नारायण लांजेकर आणि दिगंबर नारायण लांजेकर (रा. भवानी पेठ, सातारा) यांच्याविरुद्ध तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा (भादवि कलम ३०४) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप साबळे यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भिंत कोसळून तीन गणेशभक्तांचा मृत्यू !
By admin | Published: September 09, 2014 10:55 PM