सातारा : मंगळवार तळ्याच्या दुरवस्थेमुळे यंदा जे अनेक जनसमूह कंबर कसून कामाला लागले, त्यापैकी मंगळवार तळे विकास प्रतिष्ठान हा एक प्रमुख गट आहे. विशेष म्हणजे, प्रबोधनासाठी सर्व महिला सरसावल्या असून, त्यांच्या प्रयत्नांतून रामाचा गोट परिसरातील तीन गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज परिसरातील सुमारे दीडशे कुटुंबांनी शाडूची मूर्ती आणून घरीच बादलीत विसर्जन करण्याचे ठरविले आहे.नागाचा पार, भटजी महाराज मठ आणि लोकमान्य गणेशोत्सव मंडळ ही रामाचा गोट परिसरातील महत्त्वाची मंडळे आहेत. मंगळवार तळे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळ्याच्या प्रदूषणाविरुद्ध गेल्या वर्षीपासूनच मोहीम सुरू आहे. यंत्रणेकडे दाद मागून उपयोग झाला नाही, तेव्हा या प्रतिष्ठानच्या महिलांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. सध्या स्वीकृत नगरसेविका असणाऱ्या हेमांगी जोशी या महिलांचे नेतृत्व करतात. गेल्या वर्षी जेव्हा त्यांच्याकडे पदही नव्हते, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी अनेक पत्रे दिली. तळ्यातून पाणी वाहून नेणारी जुनी प्रणाली सुरू करून मिळावी आणि विसर्जनाला पर्याय शोधावा, असे या पत्रांद्वारे प्रशासनाला सांगितले गेले.तळ्याचे प्रदूषण निर्माल्य, प्लास्टिक कचरा यामुळेही होते, याची या महिलांना जाणीव होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘गणपती दान करा’ उपक्रमांतर्गत मूर्ती गोळा करायला हेमांगी जोशी पूर्वी कार्यकर्त्यांसह मंगळवार तळ्याजवळ स्वत: उभ्या राहत असत. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांनी वंदना नारकर, शुभदा कुलकर्णी, अमृता वाकनीस, सातपुते आदी महिलांना सोबत घेऊन घरोघर प्रबोधनाला सुरुवात केली. रामाच्या गोटातील जानकी महिला बचत गटाचे नेतृत्व जोशी करतात. या गटातील वीस महिलांनी यावर्षी शाडूची मूर्ती आणून घरच्या घरी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. नंतर या महिलांनी परिसरातील सर्व अपार्टमेन्ट्समध्ये जाऊन लोकांचे मतपरिवर्तन करायला सुरुवात केली. सोसायट्यांच्या अध्यक्षांना तोंडी सांगितले. आता पत्रकेही छापून घेतली. ती वाटून शाडूचा गणपती आणि घरच्या घरी विसर्जन करण्याच्या मोहिमेचा विस्तार या महिला करीत आहेत. सुमारे दीडशे कुटुंबांनी तसा निर्णयही घेतला आहे. यातील काही घरांमध्ये धातूचा गणपती आणला जाणार आहे.जोशी यांच्या पंचवटी अपार्टमेंट या इमारतीत सार्वजनिक गणपती धातूचा आहे. असाच निर्णय अनेक मंडळांनी घ्यावा, यासाठी महिला प्रचार करीत आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन नागाचा पार मंडळाचे अच्युतराव जाधव, भटजी महाराज मठ मंडळाचे संजय थोरात, लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे आप्पा नारकर आणि या तीनही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदा कायमस्वरूपी गणेशमूर्ती आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या या परिसरातील मंडळांची संख्या आता पाच झाली आहे. (लोकमत टीम)
रामाच्या गोटात तीन गणेशोत्सव मंडळे सरसावली!
By admin | Published: July 11, 2014 11:13 PM