सातारा : कºहाड तालुक्यातील मसूर येथे जटाशंकर मंदिर परिसरात तीन ऐतिहासिक शिलालेख आढळले. यापैकी एका शिलालेखावर गीतेतील श्लोक कोरण्यात आले आहेत. लेखाचे अक्षरवळण व भाषेवरून तो सतराव्या शतकातील असावा, असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले आहे.
सातारा-कºहाड रस्त्यावरील मसूर हे गाव शिवपूर्व काळापासून प्रसिद्धीस आलेले आहे. गावात समर्थ स्थापित मारुतीच्या बरोबरच प्राचीन मंदिरे, स्मृतिशिळा, वाड्यांचे अवशेष आहेत. जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या सदस्यांना या ठिकाणी दोन, तर गावाकुसातील एका वाड्यालगत एक असे तीन शिलालेख आढळले. मंदिराजवळील शिलालेखावर ‘परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे’ असे गीतेतील वचन आहे.
त्याखालच्या शिळेवर आणखी एक लेख असून, तो तीन रकान्यात कोरला आहे. यातील पहिल्या रकान्यात चंद्र्र-सूर्यासह कमल दलाचे चित्रण केलेले आहे. दुसऱ्या रकान्यात चार ओळींचा ‘श्री जटाशंकर श्री राम जयराम जय जय राम नरसोजी बिन कमाजी देसाई जगदाळे कसबे मसूर याचे वडिलाचे जुने थडग्यास गचे केला. सुळतानजीचा ळेक माहादाजी देसाई,’ असा मराठीतील लेख आहे. या लेखावरून महादजी नावाच्या व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या समाधीस ‘गचे’ केले म्हणजे चुन्याचे बांधकाम केले, असा आशय स्पष्ट होतो. मसूरचे महादजी जगदाळे-देसाई हे नाव ताराराणीकालीन इतिहासात आढळते.
हे शिलालेख साताºयाच्या इतिहास अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरतात. या शिलालेखांमुळे तत्कालीन सामाजिक, धार्मिक परिस्थिती नव्याने समजून घेण्यास मदत होईल. स्थानिकांनी या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे गरजेचे आहे.- नीलेश पंडित, कार्याध्यक्ष,जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था.