कऱ्हाड : येथील प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला असून ही स्पर्धा मंगळवार, दि. ८ पर्यंत होणार आहे. स्पर्धेत दहा जिल्ह्यातील तीनशे स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण व काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येथील शिवाजी स्टेडियमवर पहिली राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून ३०० खेळाडू सहभागी झाले आहेत.या स्पर्धेसाठी राष्ट्रीय दर्जाचे ‘हुवा कोर्ट’ उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत निवड होण्यासाठी कऱ्हाडमधील स्पर्धेतून अग्रमानांकन ठरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अहमदनगर, ठाणे, सोलापूर, उस्मानाबाद यासह विविध जिल्ह्यांतून खेळाडू कऱ्हाडला दाखल झाले आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत विविध गटांत साखळी पद्धतीने सामने खेळविले जात आहेत.कऱ्हाड शहरात राज्यस्तरीय स्पर्धा भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच यासाठी खास तयार केलेल्या कोर्टबद्दलही कऱ्हाडकरांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच स्पर्धा पाहण्यास कऱ्हाडकर नागरिकांनी गर्दी केली आहे. (प्रतिनिधी)
दहा जिल्ह्यांतील तीनशे हरहुन्नरी खेळाडूंचा सहभाग
By admin | Published: July 06, 2014 11:13 PM