रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्राला लागलेल्या वणव्यात एक हेक्टर क्षेत्रातील गवतासह सुमारे तीनशे रोपे जळाली. दरम्यान, वनरक्षकाच्या तत्परतेने आग आटोक्यात आल्याने नऊ हेक्टर क्षेत्र वाचले आहे.
पवारवाडी येथील घाट परिसरातील वनविभागाच्या हद्दीमध्ये सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. या वणव्यामुळे आगीसह धुराचे लोट आकाशात उठू लागले. हे दृश्य नजरेस पडताच या घटनेची माहिती पवारवाडी येथील शेतकरी शामराव पवार यांनी दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोळेकर यांनी तत्काळ याबाबतची माहिती रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख व कोरेगावचे वनक्षेत्रपाल राजू आटोळे यांना देऊन त्यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी तातडीने हजर झाले.
तत्काळ परिसरातील लोकांना व वन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ब्लोअर मशीन व निर्गुडीच्या फांद्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. सात ते आठ लोकांच्या सहकार्याने तब्बल दीड तासांनी वणवा आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत वणव्याने एक हेक्टर क्षेत्रातील सरपटणारे लहान वन्यप्राणी, कीटक, गवत तसेच करंज, बांबू, लिंब आपटा आदी विविध प्रकारच्या झाडांची रोपे आगीत जळाली; परंतु आग लवकर आटोक्यात आल्याने इतर नऊ हेक्टर क्षेत्रांतील गवतासह रोपे बचावली आहेत.
चौकट :
अज्ञाताकडून वणवा
पवारवाडीतील घाट परिसरातील सुमारे दहा हेक्टर वनविभागाच्या क्षेत्रामध्ये अडीच वर्षाची सुमारे सात हजार रोपे आहेत. या क्षेत्रात वणवा लागू नये म्हणून रस्त्याकडेने व ठिकठिकाणी जाळरेषा यापूर्वीच काढण्यात आली आहे; परंतु वणवा लागल्याचे ठिकाण पाहता अज्ञाताने जाणीवपूर्वक वणवा लावल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास सुरू केला असल्याची माहिती वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिली.
फोटो : २२रहिमतपूर
पवारवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील वनक्षेत्रात वणवा लागल्याने रोपांसह गवत जळाले. (छाया : जयदीप जाधव)