मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ३९ कोटी १३ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानुसार ३९ कोटी ११ लाख खर्च अपेक्षित धरून दोन लाख ९९ हजार ९९९ म्हणजेच तीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनंदा साठे होत्या. नगरपंचायत सभागृहात दुपारी दोन वाजता सभेस प्रारंभ झाला. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी विषय वाचन केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील विविध विकासकामांच्या विषयांसह सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना उपनगराध्यक्ष शिंदे यांनी यापूर्वी एक कोटी पाच लाख संकलित कराचे उत्पन्न होते, ते नवीन मूल्यवर्धित करामुळे केवळ एक कोटी ४९ लाख उत्पन्न जमा होणार आहे. त्यामुळे नवीन पद्धतीच्या घरपट्टीत जास्त वाढ झाली नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय पाणीपट्टी एक कोटी २५ लाख, वृक्षकर, ड्रेनेजकर वीस लाख ८५ हजार, विकास शुल्क, प्रमाण शुल्क व सुधारित नियमांप्रमाणे प्रीमियमच्या माध्यमातून १ कोटी ६९ लाख लोकवर्गणी रूपाने एक कोटी, मागील वर्षातील थकबाकी ९९ हजार, व २०१४-१५ वर्षात शासनाकडून विविध विकासकामांसाठी मिळालेले ३३ कोटी ४९ लाख १५ हजार ९९९ रुपये असे एकूण ३९ कोटी १३ लाख ९९ हजार ९९९ रुपये एवढी जमा होणार आहे. त्या अंदाजपत्रकानुसार जमा होणाऱ्या पैशातून होणाऱ्या खर्चाच्या बाजूला सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दहा कोटी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी चार कोटी ४७ लाख सोलरसिटी प्रकल्पासाठी पन्नास लाख, नागरी घरकुल योजनेसाठी ७५ लाख, वृक्षलागवड तीन लाख, नागरी संरक्षण विमा तीन लाख, शेती सुधार योजनेंसाठी तीन लाख शहर विकास आराखड्यातील भाजी मार्केट, टाऊन हॉल, बाग बगीचा व स्पोर्टस् कॉम्प्लेक्स साठी, एक कोटी पन्नास लाखांसह प्रशासकीय सर्व प्रकारचे खर्च व शासनाचे त्या-त्या विकासकामावर होणारा खर्च असे एकूण ३९ कोटी ११ लाख खर्च अपेक्षित धरला आहे. त्यामुळे दोन लाख ९९ हजार ९९९ म्हणजेच तीन लाख शिल्लक दाखविली आहे. (प्रतिनिधी)पाणीपट्टीत वाढ नाहीनगरपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्न वाढीचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला असला तरी पाणीपट्टीत मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. त्याच बरोबर शेतीसाठी भरीव तरतूद करून शेतकरी सहल व शेतीपूरक वस्तू देण्यासाठी तीन लाखांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. उत्पन्नवाढीचा दृष्टिकोन सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकानुसार उतारे व जन्ममृत्यूच्या दाखल्यांमध्ये नाममात्र वाढ करण्यात आली आहे. मात्र व्यावसायिक फायद्यांच्या दाखल्याची फी दुप्पट करण्यात आली आहे. जाहिरात फलकाचे प्रतिदिन दरही वाढविण्यात आले आहेत. या शिवाय घरपट्टीचे मागील उत्पन्न व सध्याचे प्रस्तावित उत्पन्न विचारात घेता २० ते २५ टक्के वाढ झाल्याने दिसत आहे. यावरून या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचा दृष्टिकोन दिसून येत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या सूचनेचा विचार करून सभेत तातडीने प्राथमिक उपाय करण्याचा ठराव करण्यात आला. शोषखड्डे व टीसीएल मिसळून पाणी शुद्धीकरणासाठी तातडीने नऊ लाखांची तरतूद करण्यात आली.
तीन लाखांचे शिलकी अंदाजपत्रक
By admin | Published: February 25, 2015 9:45 PM