कऱ्हाड : फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. तासवडे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मृतांमध्ये माय-लेकरासह संबंधित महिलेच्या दिराचा समावेश आहे.हिंदुराव मारुती शिंदे (वय ५८), सीमा सदाशिव शिंदे (४८), शुभम सदाशिव शिंदे (२३), अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर नीलेश शंकर शिंदे (२५) व विनोद पांडुरंग शिंदे (४०) या जखमींवर उपचार सुरू आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तासवडे येथे शिंदे वस्तीवर रघुनाथ जाधव यांची विहीर आहे. या विहिरीवर वीज कनेक्शन आहे. या परिसरात आणखी एक नवीन वीज वाहिनी जोडण्यात आली आहे. या विहिरीच्या परिसरातच फुलांची झाडे असून, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हिंदूराव शिंदे, त्यांची भावजय सीमा शिंदे व पुतण्या शुभम हे फुले तोडण्यासाठी गेले होते. फुले तोडत असताना अचानक शुभमला शॉक लागून तो विहिरीत फेकला गेला. नजीकच असलेल्या सीमा व हिंदूराव यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर शुभमच्या मदतीसाठी त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार शॉक लागून तेसुद्धा विहिरीत फेकले गेले.दरम्यान, एकाचवेळी तिघेजण विहिरीत कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. या आवाजामुळे नीलेश शिंदे व विनोद शिंदे हे त्याठिकाणी धावले. त्यांनाही विजेचा शॉक लागून ते गंभीर जखमी झाले. या आरडाओरडामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित केला. पोलीसही दाखल झाले. विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढून कराडला नेण्यात आले. जखमींनाही उपचारार्थ कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, फुले काढताना घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 5:01 PM