सातारा : जमिनीच्या वादातून खंडू बबन चव्हाण (रा. पाडळी, ता. कोरेगाव) यांचा खून केल्याप्रकरणी येथील तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. ए. चव्हाण यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.नितीन जयसिंग फाळके, दिलीप संपत फाळके व दत्तू ऊर्फ अशोक श्रीरंग फाळके (सर्व रा. पाडळी, सातारारोड, ता. कोरेगाव) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी रणजित बबन चव्हाण (रा. पाडळी, ता. कोरेगाव) यांचे भाऊ खंडू चव्हाण यांचा वरील तिघांसोबत जमिनीच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून दि. ६ आॅगस्ट २०१४ रोजी तिघांनी संगनमत करून पाडळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर खंडू चव्हाण यांना जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. यात खंडू चव्हाण यांच्या पोटातील आतडी तुटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने या तिघांना जन्मठेप तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि मयताच्या कुटुंबीयांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलिस प्रॉसिक्युशन स्कॉडचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पवार, हवालदार अजित शिंदे, शमसुद्दीन शेख, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे, स्नेहल गुरव, राजेंद्र कुंभार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप
By admin | Published: March 02, 2017 11:34 PM